News Flash

आदिवासी पट्टय़ात भाजपचे वर्चस्व

वसई, नालासोपाऱ्यात बविआ, तर बोईसरमध्ये शिवसेनेला अधिक मते

विजय गावित यांना विजयी घोषित केल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

वसई, नालासोपाऱ्यात बविआ, तर बोईसरमध्ये शिवसेनेला अधिक मते

पालघर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपने शिवसेनेवर मात केली असली तरी मतदारसंघातील सर्वच विधानसभा मतदारसंघांत भाजप-शिवसेनेची अटीतटीची लढाई पाहायला मिळाली. डहाणू, विक्रमगड या आदिवासी पट्टय़ात मिळालेल्या मताधिक्यामुळे भाजपला या निवडणुकीत विजय मिळवता आला. वसई आणि नालासोपारा या मतदारसंघांवरच अवलंबून राहणाऱ्या बहुजन विकास आघाडीला अन्य विधानसभा मतदारसंघांत मात्र फारशी मते मिळाली नाहीत. शिवसेनेनेच्या सर्वच मतदारसंघांत भाजपला कडवी लढत दिली असली तरी बोईसरमध्येच त्यांना भाजपपेक्षा अधिक मते मिळाली.

पालघर लोकसभा मतदारसंघात वसई, नालासोपारा, बोईसर, पालघर, डहाणू, विक्रमड असे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. वसई, नालासोपारा आणि वसई शहराचा अर्धा भाग मिळून तयार झालेल्या बोईसर मतदारसंघात बहुजन विकास आघाडीचे तीन आमदार असून महापालिकेत एकहाती सत्ता आहे. पालघर, डहाणू, विक्रमगड या मतदारसंघांत शिवसेना आणि भाजपची समान ताकद आहे. पालघरमध्ये शिवसेनेचे तर डहाणू आणि विक्रमगड मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. या पोटनिवडणुकीत वसई विधानसभेत ४८ आणि नालासोपारा मतदारसंघात केवळ ३४ टक्के मतदान झाले होते. त्यामुळे बहुजन विकास आघाडीच्या विजयाच्या आशा संपुष्टात आल्या होत्या. शिवसेना आणि भाजपची मदार पालघर, डहाणू आणि विक्रमगड या आदिवासी पट्टय़ावर तसेच बोईसर मतदारसंघातून मिळणाऱ्या मतांवर होती. गुरुवारी झालेल्या मतमोजणीत भाजपने पहिल्या फेरीपासून अल्पशी आघाडी घेतली होती.

पाचव्या फेरीनंतर बहुजन विकास आघाडी मागे पडली आणि शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर आली. दोघांमध्ये अटीतटीची लढत सुरू होती. परंतु डहाणू मतदारसंघात मिळालेल्या मताधिक्याने भाजपला तारले. डहाणू मतदारसंघातून भाजपच्या राजेंद्र गावित यांना ४९ हजार १८१मते मिळाली तर शिवसेनेला ३८ हजार ७७८ मते मिळाली. याशिवाय विक्रमगड मतदारसंघातून शिवसेनेला ५४ हजार ४५३ मते मिळाली, परंतु येथूनही भाजप ५६ हजार ५१८ अशी पाच हजार मतांची आघाडी मिळवून शिवसेनला मात देण्यात यशस्वी ठरले. शिवसेनेने मात्र बोईसर मतदारसंघात ४९ हजार ९९१ मते मिळवून ४१ हजार ६३२ मते मिळवणाऱ्या भाजपवर ८ हजार मतांची आघाडी मिळवली.

वसई, नालासोपारा आणि बोईसरवर वर्चस्व असणाऱ्या बहुजन विकास आघाडीला या मतदारसंघांकडून आशा होत्या, परंतु वसईतून ४८ टक्के आणि नालासोपारा मतदारसंघातून ३४ टक्के मतदान झाल्याने आधीच पराभवाची चाहूल लागली होती. बविआला वसईतून ६४ हजार ४७८ तर नालासोपारा मतदारसंघातून ७९ हजार १३४ मते मिळाली. याच दोन्ही मतदारसंघांतून बविआला सुमारे दीड लाख मते मिळाली होती, परंतु डहाणूत अवघी ५ हजार ४८४ आणि पालघरमधील केवळ १३ हजार ६९० मतांमुळे बविआ थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली.

कमी मतदानाचा बविआला फटका?

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती असली तरी मोदी लाटेचा फायदा भाजपला झाला होता, मात्र तरीही बहुजन विकास आघाडीला वसई आणि नालासोपारा मतदारसंघातून चांगली मते मिळाली होती. यदा या दोन्ही मतदारसंघांत कमी मतदान झाल्याने त्याचा फटका बविआला बसला आणि ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले.

२०१४ च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपची युती होती. तर काँग्रेसने बहुजन विकास आघाडीला पाठिंबा दिला होता. त्यावेळी मतदानाची टक्केवारी ६२ टक्के होती. यंदा हे प्रमाण अवघे ५१ टक्के होते. बहुजन विकास आघाडीला नालासोपारा आणि वसईतून मागच्या वेळेपेक्षा कमी मतदान झाल्याने ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. बविआला विक्रमगडमधून गेल्या वर्षीपेक्षा ३० हजार, तर पालघरमधून सुमारे १७ हजार मते कमी पडली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2018 12:40 am

Web Title: bjp domination in vasai
Next Stories
1 शिक्षण विभागाच्या चुकीचा फटका विद्यार्थ्यांला
2 मासेमारी नौका मुदतीआधीच किनाऱ्याला
3 काँग्रेसची पारंपरिक मते गेली कुठे?
Just Now!
X