08 April 2020

News Flash

भाजप नगरसेविकेचे पद धोक्यात

पडतसाळणी समितीकडून जात प्रमाणपत्र रद्दबातल

पडतसाळणी समितीकडून जात प्रमाणपत्र रद्दबातल

मीरा-भाईंदर महापालिकेतील भाजपच्या नगरसेविका सरस्वती मयेकर यांचे जात प्रमाणपत्र विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने रद्दबातल ठरवले आहे. महानगरपालिकेच्या आयुक्तांना याप्रकरणी नियमानुसार कारवाई करण्याची शिफारस केल्याने मयेकर यांचे नगरसेवकपद धोक्यात आले आहे.

सरस्वती मयेकर यांनी २०१२ मध्ये भाईंदर पूर्व येथील प्रभाग क्रमांक ४ अ मधून निवडणूक लढवली होती. हा प्रभाग नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला यासाठी राखीव असल्याने मयेकर यांनी मच्छीमार दाल्दी या जातीचे प्रमाणपत्र निवडणूक आयोगाला सादर केले होते. मयेकर या प्रभागातून विजयी झाल्यानंतर त्यांच्या जात प्रमाणपत्राला त्यांच्या विरोधात निवडणूक लढविलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार नर्मदा वैती यांनी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे आव्हान दिले. २०१३ मध्ये समितीने जात प्रमाणपत्राची पडताळणी केल्यानंतर मयेकर यांचे जात प्रमाणपत्र रद्द केले.

त्यामुळे तत्कालीन महापालिका आयुक्तांनी त्यांचे नगरसेवकपद रद्द केले. परंतु या आदेशांना मयेकर यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यावर न्यायालयाने मयेकर यांच्या जात प्रमाणपत्राची फेरपडताळणी करण्याचे आदेश देऊन समितीचा निर्णय येईपर्यंत मयेकर यांचे नगरसेवकपद कायम केले होते.

न्यायालयाच्या आदेशानुसार समितीने सरस्वती मयेकर यांच्या जातप्रमाणपत्राची फेरपडताळणी करून निर्णय दिला आहे. मयेकर यांची मच्छीमार दाल्दी ही जात सिद्ध होत नसल्याने त्यांना ठाणे उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिलेला मच्छीमार दाल्दी या जातीचा दाखला अवैध ठरविण्यात येत असून तो सरकार जमा करण्याचे आदेश कोकण विभागीय समितीने दिले आहेत.

मयेकर यांच्यावर महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय व विशेष मागासवर्गीय अधिनियमानुसार योग्य ती कारवाई करण्याची शिफारस महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे केली आहे. त्यामुळे मयेकर यांचे नगरसेवकपद धोक्यात आले असून आयुक्त आता यावर काय भूमिका घेतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 21, 2016 1:13 am

Web Title: bjp in bhayander
Next Stories
1 सफाई कामगार नव्हे, आरोग्यसेवक म्हणा!
2 तिवरकत्तलीत मोठी वाढ
3 वाचनामुळे विचार प्रगल्भ झाले!
Just Now!
X