कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना येथील लोक भावनेचा आदर करा आणि आयुक्त बदला, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. या निवडणुकीत शिवसेनेला टक्कर द्यायची असेल तर भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्याची नियुक्ती करणे काळाची गरज आहे, असेही या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जाते. दरम्यान, भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी देण्याच्या मागणीसाठी सकारात्मक पातळीवर विचार केला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचा दावा भाजपच्या एका आमदाराने ‘ठाणे लोकसत्ता’ला दिले.
विद्यमान आयुक्त मधुकर अर्दड यांच्या कार्यपद्धतीमुळे प्रशासनाचा कारभार ठप्प पडला आहे, अशा तक्रारी सातत्याने केल्या जात आहेत. विशेषत लोकप्रतिनिधींमधून आयुक्तांच्या कार्यपद्धतीविषयी नाराजीचा सूर उमटू लागला आहे. कल्याण डोंबिवली शहरातील बडे विकासक आणि वास्तुविशारदकांनीही शासन पातळीवर आयुक्तांच्या बदलीसाठी हालचाली चालवल्याची चर्चा आहे. नगरसेवकांच्या विकास कामांच्या नस्ती रोखण्यात येत आहेत. उलटसुलट शेरे मारून या नस्ती लालफितीत अडकविल्या जात आहेत, अशा स्वरूपाच्या तक्रारी कल्याण डोंबिवलीतील भारतीय जनता पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्याचे वृत्त आहे.
महापालिकेच्या कामकाज, नियमांविषयी अर्दड हे नवखे आहेत. त्याचा परिणाम विकास कामांवर आहे, असेही स्थानिक नेत्यांनी  फडणवीस यांच्या निदर्शनास आणले. कल्याण डोंबिवली महापालिकेला भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी मिळावा यासाठी भाजपचे स्थानिक नेते आग्रही आहेत.