गोवा आणि मणिपूरमध्ये बहुमत नसताना सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने केलेले राजकारण देशाच्या संसदीय लोकशाही पद्धतीला घातक आहे. सत्तेसाठी भाजप कोणत्याही थराला जात असून, लोकशाही दुबळी करण्याचा या पक्षाचा प्रयत्न आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी केली. कल्याणजवळील वरप येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

या मेळाव्यात शरद पवार यांनी ‘अच्छे दिन’, नोटाबंदी, गोहत्या, शेतकरी कर्जमाफी आदी मुद्दय़ांवरून भाजपला लक्ष्य केले. ‘‘देश वेगळ्या संक्रमणावस्थेतून जात आहे. सर्वाना सोबत घेऊन काम करण्याचा दृष्टिकोन सत्ताधाऱ्यांकडे नाही. सत्ताधाऱ्यांकडून अल्पसंख्याक, दलित, महिलांबद्दल अपशब्द वापरले जातात. अशा स्थितीत सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसवर मोठी जबाबदारी आहे,’’ असे पवार म्हणाले.

‘‘भाजप सत्ता मिळविण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो, हे गोवा आणि मणिपूरमधील निवडणुकीतून स्पष्ट झाले आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसने एकत्रितपणे विरोधी पक्ष म्हणून अधिक जबाबदारीने काम करायला हवे,’’ असे पवार यांनी स्पष्ट केले. पवार यांनी या वेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरही टीका केली. या मेळाव्याला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, माजी मंत्री गणेश नाईक, माजी खासदार आनंद परांजपे आदी उपस्थित होते.

नेमकी कोणाची समृद्धी?

मुख्यमंत्र्यांनी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग करण्याचा निश्चय केला आहे, पण या समृद्धी महामार्गाने नेमकी कोणाची समृद्धी होणार आहे, असा प्रश्न पवार यांनी केला. शेतकऱ्यांचे हित जपल्याशिवाय हा मार्ग पूर्ण होऊ दिला जाणार नाही, असा इशारा पवार यांनी दिला.

कल्याण ग्रामीणमध्ये मेळावा का?

कल्याणच्या ग्रामीण भागात हा मेळावा घेतल्याबद्दल राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्येच आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. भिवंडीत पालिका निवडणुका होऊ घातल्या आहेत. तेथे मेळावा घेतला असता तर पक्षाला त्याचा लाभ उठवता आला असता, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होती. मात्र, पक्षातील दोन नेत्यांच्या आग्रहामुळे येथे मेळावा घेण्यात आल्याचे समजते.