भाजप सदस्याचा राजीनामा, संख्याबळ घटल्याने अधिकृत उमेदवार पराभवाच्या छायेत

उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेच्या स्थायी समिती निवडणुकीत भाजपचे दोन अधिकृत उमेदवार असतानाही विजय पाटील यांनी अर्ज दाखल केल्याने भाजपातील बंडखोरी उफाळून आल्याचे दिसून आले आहे. त्यातच मंगळवारी भाजपचे स्थायी समिती सदस्य डॉ. प्रकाश नाथानी यांनी आपल्या स्थायी समिती सदस्यपदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्याने भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे.

अनिश्चित आणि धक्कातंत्राच्या राजकारणासाठी प्रसिद्ध असलेल्या उल्हासनगर शहरात संख्याबळ असूनही भाजपला विविध पातळ्यांवर पराभवाचा सामना करावा लागतो आहे. गेल्या वर्षांत भाजपतील टीम ओमी कलानी गटाने पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाला बगल देत विधानसभेतील वचपा काढण्यासाठी शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान केले. त्यामुळे संख्याबळ असतानाही भाजपला महापौरपद गमवावे लागले. त्यानंतर स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडीत ही फू ट टाळण्यासाठी भाजपने सुरुवातीपासून टीम ओमी कलानी गटाच्या बंडखोर नगरसेवकांना गोंजारण्याचे काम केले. तर दुसरीकडे निष्ठावंत नगरसेवकांना स्थायी समितीत सदस्य पद देऊन फुटीच्या शक्यताही संपवण्याचे काम भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी केले. मात्र, या काळात भाजपच्या स्थायी समिती सभापती पदासाठी जुन्याच चेहऱ्यांना पुन्हा संधी दिल्याने भाजपच्या निष्ठावंतांच्या गोटात अस्वस्थता पसरली होती.

त्यातच भाजपचे स्थायी समिती सदस्य विजय पाटील यांनी सोमवारी स्थायी समिती सभापतीपदासाठी अर्ज भरल्याने भाजपात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे शिवसेनेच्या सदस्यांनी पाटील यांना पाठिंबा दिल्याचे दिसून आले. या धक्कय़ातून भाजप सावरत असतानाच मंगळवारी सकाळी भाजपचे नगरसेवक आणि स्थायी समिती सदस्य डॉ. प्रकाश नाथानी यांनी महापौर आणि आयुक्तांना आपल्या सदस्यपदाचा राजीनामा सुपूर्द केला. शिवसेनेच्या महापौर लीलाबाई आशान यांनी तात्काळ हा राजीनामा मंजूर करत असल्याची टिप्पणी त्या राजीनाम्यावर लिहून देत राजीनामा स्वीकारला. डॉ नाथानी यांनी नाराजीतून राजीनामा दिल्याची चर्चा आहे.

पालिकेतल्या राजकीय खेळीत भाजप पक्षश्रेष्ठी कमी पडत असल्याचे बोलले जाते. तर महापौरपदानंतर स्थायी समिती सभापतीच्या निवडणुकीतही शिवसेनेचे वरिष्ठ नेते भाजपात फू ट पाडण्यात यशस्वी ठरल्याची चर्चा शहरात रंगली आहे.

सदस्य संख्या एकने कमी

भाजपचे स्थायी समिती सदस्य डॉ. प्रकाश नाथानी यांच्या राजीनाम्यानंतर एकूण १६ सदस्यांच्या स्थायी समितीत आता भाजपकडे अवघे ८ सदस्य उरले असून त्यातही विजय पाटील हे स्वत: बंडखोर उमेदवार असल्याने ही संख्या एकने कमी झाली आहे. त्यामुळे महापौर पदानंतर आता स्थायी समिती सभापती पदाचे हाती असलेले पदही गमावण्याची शक्यता निर्माण झाली आहे.