मॅरेथॉनमधील सहभागामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य

सागर नरेकर, बदलापूर

आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप या दोन सत्ताधारी पक्षात युती होणार किंवा कसे याविषयी राजकीय वर्तुळात कमालीची उत्सुकता असतानाच बदलापुरात मात्र भाजपचे विद्यमान आमदार किसन कथोरे यांनी शिवसेना नेत्यांशी जवळीक साधण्यास सुरुवात केली आहे. कथोरे यांचे एकेकाळचे कट्टर विरोधक आणि या भागातील शिवसेनेचे बडे प्रस्थ वामन म्हात्रे यांनी रविवारी आयोजित केलेल्या वर्षां मॅरेथॉन स्पर्धेत कथोरे थेट शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेऊन धावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. एकेकाळी विळ्या-भोपळ्याचे नाते असलेले हे दोघे राजकीय विरोधक एकत्र येण्यामागील नेमके गणित कोणते याविषयी आता राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली आहे.

कुळगाव, बदलापूर तसेच अंबरनाथ परिसरात भाजप आणि शिवसेनेत फारसे सख्य नाही. पाच वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीपाठोपाठ नगरपालिका निवडणुकाही हे दोन पक्ष एकमेकांविरोधात लढले. बदलापुरात विद्यमान आमदार किसन कथोरे यांचे अनेक वर्ष वर्चस्व राहिले आहे. हे वर्चस्व मोडीत काढत शिवसेनेने येथील नगरपालिका एकहातीजिंकली. तेव्हा आणि त्या आधीपासून कथोरे यांना कमी लेखण्याची एकही संधी बदलापुरातील शिवसेना नेते सोडत नाहीत. अडीच वर्षांपूर्वी नगराध्यक्ष राहिलेले वामन म्हात्रे हे तर कथोरे यांचे कट्टर विरोधक. कथोरे यांनी शहरात एकही काम नीट केले नाही, अशी टीका म्हात्रे यांनी यापूर्वी अनेकदा केली. जागोजागी पडलेल्या खड्डयांना जबाबदार धरत कथोरे यांच्यावर टीका करण्यातही शिवसेनेचे नेते अग्रभागी राहिले. गेल्या काही महिन्यांपासून मात्र हे चित्र पूर्णपणे पालटले आहे. एकमेकांना पाण्यात पहाणारे कथोरे आणि म्हात्रे सध्या शहरात गळ्यात गळे घालून वावरताना पाहून अनेकांना आश्चर्य वाटू लागले आहे. शहरातील अनेक कार्यक्रमातही हे दोघे एकत्र नांदताना पाहून या युतीमागील नेमके कारण काय याविषयी तर्कवितर्क सुरू झाले आहेत.

मॅरेथॉनमध्येही युती

शनिवारी पार पडलेल्या शिवसेनेच्या वर्षां मॅरेथॉन स्पर्धेच्या उद्घाटनानिमित्ताने पुन्हा आमदार शिवसेनेच्या व्यासपीठावर आले होते. यावेळी त्यांनी स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी स्पर्धेला झेंडा दाखवला. ते इतक्यावरच थांबले नाहीत तर आमदार यांनी भगवा हाती घेत थेट स्पर्धकांसोबत धाव घेतली. त्यांच्या या धावेची चर्चा दिवसभर शहरात रंगली होती. युतीचे गणित नक्की झाल्यास कथोरे यांना साथ देण्याशिवाय म्हात्रे यांना पर्याय नाही. त्यानंतर लगेचच होणाऱ्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत कथोरे यांची मदत शिवसेनेला मिळू शकते, अशी गणिते याबाबतीत मांडली जात आहेत. याबाबत आमदार किसन कथोरे यांना विचारले असता, मी युतीचा आमदार आहे. त्यामुळे युतीतील पक्षाच्या कार्यक्रमाला जातो, असे त्यांनी सांगितले.