आकसाने कारवाई केल्याचा आमदार गायकवाड यांचा आरोप

कल्याण पूर्व भागातील भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या भागीदारीत केबल व्यवसाय करणाऱ्या दर्पिता ट्रेडिंग कंपनीचे (केबल नियंत्रण कक्ष) कार्यालय मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील करमणूक कर अधिकारी, कल्याण तहसीलदार यांच्या उपस्थितीत सील करण्यात आले. महसूल विभागातील एका उच्चपदस्थ सूत्राने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

दर्पिता ट्रेडिंग कंपनीने सुमारे साडे पाच कोटी करमणूक कर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या करमणूक कर विभागाकडे भरणा केलेला नाही. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. ही कंपनी कोणा लोकप्रतिनिधीशी संबंधित आहे की नाही, हे माहिती नसल्याचे महसूल विभागातील सूत्राने स्पष्ट केले. कल्याण पूर्व भागात आमदार गणपत गायकवाड व त्यांच्या भागीदारीत कंपनीचा केबल व्यवसाय आहे. भागीदारीतील कंपनी दर्पिता ट्रेडिंग कंपनी ही मुख्य सेवा देणारी कंपनी आहे. या कंपनीच्या चालकाला वारंवार कर भरण्याचे कळवूनही भरणा करण्यात येत नसल्याने ही कारवाई जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी यांच्या आदेशावरून तहसीलदार किरण सुरवसे, करमणूक विभाग तहसीलदार उज्ज्वला बनसोडे यांनी संयुक्तपणे केली आहे.

दर्पिता ट्रेडिंग कंपनीमधून केबल सेवा दिली जात नाही. या ठिकाणी केबल सेवेचा मुख्य नियंत्रक (सव्‍‌र्हर) आहे. तो महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी येऊन आकसाने सील केला आहे. गेल्या वर्षी आपण जिल्हाधिकारी कार्यालयाकडे ठाणे जिल्ह्य़ात किती केबल सेवा पुरवठादार आहेत,  त्यांच्यापैकी किती जणांकडे अधिकृत परवाने आहेत. त्यामधील किती जण कर भरणा करतात. त्यांच्याकडे किती जोडण्या आहेत, याची माहिती मागितली होती. ही माहिती दिली तर करमणूक कर विभागाचे भांडे फुटणार होते. या विभागात वर्षांनुवर्ष अनागोंदी कारभार सुरू आहे. त्यामुळे आपणास माहिती देण्याऐवजी आपल्याच सेवा कंपनीची सविस्तर माहिती देण्याची नोटीस जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली. ती माहिती वेळेत देण्यात आली नाही म्हणून त्या आकसापोटी आपल्या भागीदार कंपनीवर कारवाई करण्यात आली आहे.

२७ गावांच्यामध्ये बेसुमार बेकायदा बांधकामे महसूल विभागाच्या आशीर्वादाने सुरु आहेत. तिथला भ्रष्टाचार जिल्हाधिकारी कार्यालयाला दिसत नाही का? असा प्रतिप्रश्न आमदार गायकवाड यांनी केला आहे.

केबल सुरूच

कंपनीचा नियंत्रक बंद केल्याने कल्याण पूर्व भागातील केबल सेवा ठप्प होईल, अशी चर्चा सुरू झाली होती. परंतु, कल्याण पूर्व भागातील अनेक रहिवाशांशी संपर्क साधला, त्यांनी आमची केबल सेवा सुरू असल्याचे सांगितले. त्यामुळे महसूल विभागाने नियंत्रकाला सील ठोकून नक्की केले काय, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. दरम्यान, भाजपचा एक बडा नेता रात्री कल्याण पूर्वेत आला होता. जिल्हाधिकारी जोशी या हेतुपुरस्सर भाजपच्या नेत्यांना त्रास देत आहेत, असे राजकीय वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपच्या एका गटातून चालला आहे. पण त्याला अन्य भाजप नेते, पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा मिळत नसल्याने या नेत्याचे काही चालत नसल्याचे समजते.