खासदार सुधांशु त्रिवेदी यांचे मत; कै. रामभाऊ  म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेस सुरुवात

ठाणे : परिवर्तनाची, विकासाची सुरुवात ही महाराष्ट्रातून झाली आहे. महाराष्ट्राने देशाला एक आदर्शवाद दिलेला आहे, असे मत भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते खासदार सुधांशु त्रिवेदी यांनी मांडले. ठाण्यातील कै. रामभाऊ  म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेच्या ३४ व्या पर्वाच्या पहिल्या दिवसाचे पुष्प त्रिवेदी यांनी नागरिकता संशोधन अधिनियम या विषयाला अनुसरून गुंफले. सरस्वती शाळेच्या पटांगणात या व्याख्यानमालेला गुरुवारी मोठय़ा उत्साहात सुरुवात झाली.

२०१४ नंतर प्रत्येक क्षेत्रात भारताने विकास केलेला आहे. या विकासासोबत सरकार सर्वधर्मसमभावाचे, मानवतेचे तत्त्व जपण्याचे देखील काम करत आहे. नागरिकता संशोधन अधिनियम हादेखील याचाच एक महत्त्वाचा भाग असल्याचे त्यांनी सांगितले. कै. रामभाऊ  म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेच्या उद्घाटनप्रसंगी व्याख्यानमालेचे अध्यक्ष आमदार संजय केळकर यांनी व्याख्यानमालेस कशी सुरुवात झाली या बाबतची माहिती देऊन ठाणेकर नागरिकांनी या व्याख्यानमालेस भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल श्रोत्यांचे आभार व्यक्त केले.नागरिकता संशोधन अधिनियम ही देश, काळ आणि परिस्थितीची आवश्यकता आहे. आपला देश हा अल्पसंख्याकांना आधार देणारा देश आहे. देशाने कायम सीमेच्या बाहेरील लोकांचा विचार केलेला आहे. मात्र नागरिकत्व दुरस्ती कायद्याच्या निर्णयानंतर विरोधी पक्षांनी भाजपविरोधात समाजात गैरसमज पसरवण्यास सुरुवात केली आहे. देशातील एकता कोणीही तोडण्याचा प्रयत्न केला तरी जनता कायम सत्याच्याच बाजूने राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या व्याख्यानमालेच्या उद्घाटनावेळी खा. विनय सहस्रबुद्धे, व्याख्यानमालेचे सचिव शरद पुरोहित यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. वैविध्यपूर्ण विषयांवर सुरू असणाऱ्या या व्याख्यानमालेच्या पहिल्या दिवशी उपस्थितांनी मोठी गर्दी केली होती.