‘केडीएमसी’साठी भाजप संघाच्या दारी, नाराजांच्या मनधरणीसाठी प्रयत्न

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत भाजपमागे खंबीरपणे उभे राहिलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीतही पक्षाच्या उमेदवारांना मदतीचा हात द्यावा यासाठी भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी संघातील जुन्याजाणत्यांना साकडे घालण्यास सुरुवात केली आहे.

डोंबिवलीतील भाजपच्या काही नेत्यांच्या कार्यपद्धतीवर संघातील एक मोठा गट गेल्या काही वर्षांपासून नाराज आहे. या नाराजीमुळे पाच वर्षांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीत हक्काच्या मतदारसंघांत भाजपला पराभवाचे तोंड पाहावे लागल्याची चर्चा रंगली होती. हा पूर्वानुभव लक्षात घेऊन यंदा गाफील राहायचे नाही, असा जणू चंगच भाजप नेत्यांनी बांधला असून दसऱ्यानिमित्त पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची भेट घेतल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

‘‘संघ राजकारण करीत नाही. राष्ट्रहित, सामाजिक कार्य हे संघाचे मुख्य काम आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने संघाला काही मंडळींकडून राजकारणात ओढण्याचे काम सुरू आहे. ती पद्धत चुकीची आहे,’’ असे संघाच्या एका वरिष्ठाने भाजपच्या लोकप्रतिनिधीला सुनावल्याचे समजते. ‘‘आम्ही कोणाला मतदान करावे, कोणाच्या पाठीशी राहावे याविषयी संघाला कोणी सुचवू नये. मागील दोन निवडणुकांदरम्यान आमची भूमिका प्रामाणिकपणे बजावली आहे, असे संघाच्या ज्येष्ठांनी भाजपच्या लोकप्रतिनिधीला सांगून संघ भाजपच्या पाठीशी ठाम आहे, असे संकेत दिल्याचे समजते.

भाजपचा एक नेता गेल्या दोन दिवसांपासून डोंबिवलीतील संघाच्या कार्यालयात वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत आहे. भाजप हा संघ परिवारातील घटक आहे. त्यामुळे नाराजी वगैरे नाही, असे भाजपच्या एका लोकप्रतिनिधीने सांगितले.

आम्ही आमच्या पद्धतीने भाजप उमेदवारांचा प्रचार करीत आहोत. लोकसभा, विधानसभा निवडणुकीवेळी जो मतदार भाजपच्या पाठीशी राहिला, तो मतदार पालिका निवडणुकीच्या वेळीही भाजपच्या पाठीशी राहील, असा आम्हाला विश्वास आहे.
– रवींद्र चव्हाण, आमदार, भाजप

केंद्रात, राज्यात भाजपची सरकारे आहेत. विकासाच्या वाटेवर, अतिशय योग्य पद्धतीने दोन्ही ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कारभार सुरू आहे. या दोन्ही सरकारांच्या माध्यमातून कल्याण, डोंबिवली शहरांचा विकास, चेहरामोहरा बदलणार असेल तर, भाजपचीच सत्ता या ठिकाणी यायला हवी.
– मधुकर चक्रदेव,ज्येष्ठ संघ स्वयंसेवक