ठाण्यातील नेते मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार

ठरावीक ठेकेदार आणि बांधकाम व्यावसायिकांचे चांगभलं करत ९०० कोटी रुपयांच्या प्रस्तावांना अवघ्या पाच मिनिटांत हिरवा कंदील दाखवून मनमानी करणाऱ्या ठाण्यातील सत्ताधारी शिवसेनेला आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडून उघड पाठिंब्यामुळे भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कृपा लाभलेल्या जयस्वाल यांना आता तरी आवर घाला अशी विनवणी करत यापैकी काही नेत्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या नेतेमंडळींच्या भेटीगाठी सुरू केल्याने ठाण्यातील राजकीय वर्तुळात वेगाने घडामोडी घडू लागल्या आहेत.नगरसेवकांचा एक गट शिवसेना आणि जयस्वाल यांची तक्रार घेऊन मुख्यमंत्र्यांनाही भेटणार असल्याची माहिती पक्षाच्या नेत्यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांचा तीन वर्षांचा कार्यकाल संपुष्टात आल्यानंतरही त्यांची बदली झालेली नाही. लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर शहरात कोटय़वधी रुपयांची विकासकामे आणि या कामांच्या निविदा वेळेत पूर्ण व्हाव्यात यासाठी  शिवसेनेलाही जयस्वाल ठाण्यात हवे आहेत. शहरातील उड्डाणपुलांच्या उभारणीचे काम रडतखडत सुरू असताना ठेकेदारास वाढीव पैसे देण्याचा वादग्रस्त प्रस्ताव जयस्वाल यांनी नुकताच मंजूर केला आहे. या मनमानीचे टोक म्हणून शनिवारच्या सभेत शिवसेनेने ९०० कोटी रुपयांची विकासकामे पाच मिनिटांत मंजूर करून कहर केल्याची चर्चा  रंगली असून हे प्रस्ताव मंजूर व्हावेत यासाठी जयस्वाल यांचे सभागृहातील वर्तन धक्कादायक होते असे विरोधी नगरसेवकांचे म्हणणे आहे.

‘..तर भाजपलाही फटका’

महापालिकेतील या बेबंदशाहीमुळे ठाणे शहरात शिवसेनेविरोधात मोठय़ा प्रमाणावर नाराजीचा सूर व्यक्त होत असून ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात या मनमानीचा फटका सत्ताधाऱ्यांना पुन्हा बसू शकेल, असे वातावरण भाजपचे स्थानिक नेते तयार करू लागले आहेत. मुख्यमंत्री आणि जयस्वाल यांचे निकटचे संबंध सर्वश्रुत असले तरी अलीकडच्या काळात खुद्द आयुक्तांचे वर्तनच वादग्रस्त ठरू लागल्याने भाजपलाही याचा फटका बसू शकतो. ९०० कोटींच्या कामांना देण्यात आलेल्या वादग्रस्त मंजुरीप्रकरणी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याची तयारी नगरसेवकांच्या एका मोठय़ा गटाने सुरू केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. जयस्वाल यांना वेळीच आवर घातला नाही तर सत्ताधारी शिवसेनेविरोधात बोलण्याचा नैतिक अधिकारही पक्षाला राहणार नाही, असा मतप्रवाह भाजपमध्ये आहे.