25 September 2020

News Flash

मतांसाठी सत्तेत वाटा द्या!

रवींद्र फाटक यांना विजयाचे गणित जुळवायचे असेल तर भाजपची १८९ मते निर्णायक ठरणार आहेत.

विधान परिषदेसाठी भाजपचा शिवसेनेवर दबाव

विधान परिषदेची निवडणूक गुण्यागोंविदाने लढविण्याच्या कितीही आणाभाका शिवसेना आणि भाजपचे जिल्ह्य़ातील नेते घेत असले तरी स्थानिक पातळीवर या दोन पक्षांत सुरू असलेल्या संघर्षांचे पडसाद आता उमटू लागले आहेत. विधान परिषदेत जागा निवडून आणण्यासाठी मदत हवी असल्यास आधी नगरपालिकेत सत्तेचा वाटा द्या, असा प्रस्ताव भाजपच्या काही नेत्यांनी शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख एकनाथ शिंदे यांच्यासमोर ठेवला आहे. अंबरनाथ, बदलापूरच्या नगरपालिका निवडणुका स्वबळावर लढणाऱ्या भाजपला दोन्ही ठिकाणी सत्तेपासून लांब राहावे लागले होते. मात्र, आता विधान परिषदेत शिवसेनेच्या रवींद्र फाटक यांना पाठिंबा देण्याच्या मोबदल्यात सत्तेतील पदे मिळवण्यासाठी भाजपने सेनेवर दबाव वाढवला आहे.

राज्यात सत्तेत येऊन मोठा काळ लोटला असला तरी शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये सातत्याने विसंवाद सुरू असल्याचे चित्र आहे. गेल्या काही काळात पालकमंत्री एकनाथ िशदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जुळवून घेतले असले तरी महापालिका आणि नगरपालिकांमध्ये भाजप नगरसेवकांमध्ये सेनेबाबत अस्वस्थता आहे. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत शिवसेना नेत्यांची कोंडी करून हवे ते पदरात पाडून घेण्याचा भाजपच्या स्थानिक नेत्यांचा प्रयत्न आहे.

विधान परिषदेसाठी शिवसेनेने रवींद्र फाटक यांना उमेदवारी देऊन राष्ट्रवादीच्या वसंत डावखरेंचा मार्ग खडतर केला आहे. रवींद्र फाटक यांना विजयाचे गणित जुळवायचे असेल तर भाजपची १८९ मते निर्णायक ठरणार आहेत. त्यामुळे विधान परिषदेसाठी युती झालीच आहे तर बदलापूर आणि अंबरनाथ नगरपरिषदेतही सत्तेचा वाटा मिळावा असा आग्रह भाजपचे नेते धरू लागले आहेत. येत्या २५ मे रोजी बदलापूर नगरपालिकेत विषय समित्यांची निवडणूक घेण्यात येणार आहे. समिती सभापतिपदाच्या काही जागा भाजपला सोडल्या जाव्यात, असा पक्षाच्या नेत्यांचा आग्रह आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2016 1:10 am

Web Title: bjp pressuring shiv sena for maharashtra legislative assembly election
टॅग Bjp,Shiv Sena
Next Stories
1 दोघा न्यायालयीन बंदिवानांचे मनोरुग्णालयातून पलायन
2 रस्ता रुंदीकरणासाठी ३७ झाडांचा बळी
3 केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन
Just Now!
X