कुळगांव-बदलापूर नगरपालिका निवडणुकीत ‘स्मार्ट सिटी’ आणि विकासाचा मुद्दा घेऊन प्रचारात उतरलेल्या भारतीय जनता पक्षाला नगरपालिकेत विरोधी बाकावरच बसावे लागणार हे स्पष्ट होत असताना तोंडाशी आलेला सत्तेचा घास कसा हिरावला गेला, याचा खल आता भाजपच्या वर्तुळात सुरू झाला आहे. बदलापुरात भाजपची सत्ता यावी यासाठी भिवंडीचे खासदार कपिल पाटील, स्थानिक आमदार किसन कथोरे, कल्याण जिल्हा अध्यक्ष आमदार नरेंद्र पवार, ठाणे संघटनमंत्री राजेश देशमुख यांनी यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली होती. असे असताना शिवसेनेच्या रणनीतीपुढे भाजपचे हे सामूहिक नेतृत्व पूर्णत: अपयशी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. नवी मुंबईतही भाजपला मोठा पराभव सहन करावा लागल्याने गेली अनेक वर्षे संघटनमंत्री म्हणून या पदावरील पदाधिकारी नेमके करतात तरी काय, असा सवाल आता खुद्द भाजपच्या गोटात उपस्थित केला जाऊ लागला आहे.
बदलापुरात एकहाती सत्ता यावी या दृष्टीने भाजपने बऱ्यापैकी बांधणी करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु काही ठिकाणी उमेदवारी आणि ‘एबी फॉर्म’ देण्यावरून झालेल्या गोंधळामुळे भाजपतील अंतर्गत वाद चव्हाटय़ावर आले. केंद्रात आणि राज्यात पक्षाची सत्ता आहे. आता पालिकेतील सत्तासोपान दूर नाही याच भ्रमात येथील नेतृत्व राहिले. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपत आलेले कपिल पाटील आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपवासी झालेले किसन कथोरे हे ‘नमो’ लाटेवर तरून गेले होते. यंदाही हेच चित्र कायम राहील, अशा भ्रमात कथोरे आणि पाटील राहिले. कथोरे यांच्या प्रचारात तर सुरुवातीपासून फारशी धार दिसून येत नव्हती. त्यामुळे भाजपला त्याचा मोठा फटका बसेल, अशी चर्चा अगदी सुरुवातीपासून येथील राजकीय वर्तुळात होती.

पाटील, कथोरेंचे काय?
कपिल पाटील यांच्या भिवंडी मतदारसंघातील ही निवडणूक होती. त्यामुळे शहरात भाजपचा झेंडा रोवण्यासाठी पाटील प्रयत्नांची पराकाष्ठा करतील, असे अनेकांना वाटले होते. मात्र, ते या ठिकाणी फारसे फिरकले नाहीत. आमदार किसन कथोरे यांनी ‘स्मार्ट सिटी’ आणि शहर विकासाच्या मुद्दय़ावर प्रचार केला. ते एकटेच प्रचाराच्या केंद्रस्थानी होते, बाकी सामूहिक नेतृत्व म्हणविणारे प्रत्येक जण आपआपल्या विभागात अडकून पडले होते. कल्याण जिल्हा अध्यक्ष नरेंद्र पवार यांनी सर्व लक्ष अंबरनाथकडे दिले होते. तेथेही पक्षाला फटका बसला आहे.
नाराजी भोवली
निश्चित निवडून येणार असे उमेदवार पडल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे. यात शहर अध्यक्ष मिलिंद नार्वेकर, अविनाश पातकर, मेघा गुरव हे उमेदवार पराभूत झाले. या प्रस्थापितांबद्दल असलेली नाराजी पक्षाला भोवली. त्यामुळे भाजपला सत्तास्थापनेचा आकडा पार करता आला नसल्याची प्रतिक्रिया पक्षाचे प्रवक्ते राजेंद्र घोरपडे यांनी व्यक्त केली. दरम्यान, भाजपचे २0 नगरसेवक आहेत. यात आम्हाला समाधान आहे. शिवसेनेच्या धनशक्ती आणि दहशतवादापुढे विकासाचे मुद्दे कमी पडल्याची प्रतिक्रिया आमदार किसन कथोरे यांनी दिली.

समीर पारखी, बदलापूर