श्रेय मिळवण्यासाठी जागोजागी फलक

दिवा स्थानकातून नवी लोकल सोडण्यासंबंधी रेल्वे प्रशासनाचा अद्याप अभ्यासच पूर्ण झालेला नाही. जलद लोकलला दिवा स्थानकात थांबा दिल्यास रेल्वे वेळापत्रक बिघडण्याची भीती घातली जात आहे. जंक्शन स्थानक असलेल्या दिव्यात लांब पल्ल्याच्या गाडय़ा थांबण्याच्या दृष्टीनेही काहीच उपाययोजना नाही. स्थानकाची पुरती दुरवस्था झालेली असताना रेल्वे प्रशासनाने दिवा-पनवेल शटल गाडी सुरू करताच या नव्या गाडीचे श्रेय घेण्यासाठी सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेमध्ये अक्षरश: तुंबळ फलक लढाई सुरू झाली आहे. दिवा स्थानक परिसरात या दोन पक्षांच्या नेत्यांचे मोठाले फलक लागले असून त्यामुळे हा संपूर्ण परिसर विद्रूप झाला आहे.

या वर्षी जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात दिव्यात रेल्वेप्रवाशांनी केलेल्या हिंसक आंदोलनानंतर या रेल्वे स्थानकातील गैरसोयी तसेच प्रवासी सुविधेविषयी वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला. दिव्यातून सुटणाऱ्या लोकलची संख्या वाढवणे, जलद गाडय़ांना दिव्याचा थांबा, लांब पल्ल्याच्या गाडय़ांना दिवा स्थानकातील थांबा आणि दिवा-पनवेल लोकल सारख्या मागण्या करण्यात आल्या होत्या.

यातील अनेक आश्वासने अद्याप कागदावर असताना गेल्या महिन्यात मध्य रेल्वेकडून दिवा-पनवेल शटल सेवेची घोषणा करण्यात आली. ही घोषणा होताच सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये जोरदार श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे.

शिवसेनेच्या दिवा शाखेच्या वतीने कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नावाने हे बॅनर लावून वचनपूर्ती केल्याबद्दल आभार मानण्यात आले आहेत. या बॅनरवर रेल्वे प्रशासनाकडे खासदारांनी केलेल्या मागणीचे पत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. तर भाजपच्या दिवा विभागाने खासदार कपिल पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे ही शटल सेवा सुरू झाली असून, त्यांचे आभार मानणारे बॅनर लावले आहेत. दिवा स्थानकातील दोन्ही फाटकांना चार ते पाच भलेमोठे बॅनर या पक्षांकडून लावण्यात आले आहेत. यामुळे शहराच्या विद्रूपीकरणाला हातभार लावण्यात हे पक्ष पुढे असल्याचे दिसून येत आहे.

श्रेयवादाची फलकबाजी नकोच..

दिव्यातील अनेक प्रश्न अपूर्ण अवस्थेत असून ते पूर्ण करण्याचे सोडून सत्ताधारी पक्षांमधील खासदारांची श्रेयवादाची फलकबाजी करणे चुकीचे आहे. प्रवासी संघटनासुद्धा या समस्यांविरुद्ध नेहमीच आवाज उठवत असतात. मात्र त्यांचा कुठेही कधीही श्रेयवादासाठी फलक लावल्याचे आपणास दिसणार नाही. खासदारांनी हा मोह आवरण्याची गरज आहे.
– नंदकुमार देशमुख, उपनगरीय रेल्वे प्रवासी संघटना