|| भगवान मंडलिक

जनसंघापासून डोंबिवली हा नेहमीच भाजपचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. ठाणे जसा शिवसेनेचा बालेकिल्ला तशी डोंबिवलीत पूर्वीपासूनच भाजपची मोठी ताकद राहिली आहे. या मतदारसंघातून निवडून आलेले रवींद्र चव्हाण हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. त्यांच्याकडे आता राज्यमंत्रिपदही सोपविले गेले. महापालिका निवडणुकीत शिवसेनेला धक्का देण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री या शहरात प्रचाराच्या रणधुमाळीत उतरले. हजारो कोटी रुपयांची मदत शहराच्या विकासकामांसाठी दिली जाईल, असे वचनही दिले गेले. असे असूनही गेल्या पाच वर्षांत या शहराच्या नियोजनाची अशरक्ष लक्तरे वेशीवर टांगली गेल्याचे चित्र पाहायला मिळाले. डोंबिवलीचे बकाल, कोंडीने बजबजलेले रूप दररोज वेगवेगळ्या माध्यमातून पुढे येत आहे. एवढे सगळे होऊनही या बालेकिल्ल्यात पुन्हा एकदा मोठय़ा मताधिक्याने निवडून येण्याचा विश्वास भाजप नेत्यांना आहे.

डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व मागील १० वर्षांपासून रवींद्र चव्हाण करीत आहेत. नागरिकांची नाळ त्यांनी पूर्वीच्या लोकप्रतिनिधींप्रमाणे ओळखली आहे. रस्ते, खड्डे, पूल, भुयारी मार्गापेक्षा येथल्या लोकांना उत्सवी कार्यक्रमात अडकवले की त्यांचे समधान होते हे चव्हाण पुरेपूर ओळखून आहेत. त्यामुळे दरवेळेप्रमाणे यंदाही निवडणुकांच्या तोंडावर शहरात उत्सवी कार्यक्रमांना ऊत आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पालकमंत्री एकनाथ िशदे यांच्यासोबतही त्यांचे निकटचे संबंध आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या स्थानिक सरदारांना कसे ताब्यात ठेवायचे हे त्यांना ठाऊक आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीची तर शहरात नेहमीच तोळामासा अवस्था राहिली आहे. एकीकडे हे चित्र असले तरी भाजपच्या जुन्याजाणत्यांमध्ये मात्र अस्वस्थता आहे. यावेळी समाज माध्यमांमधून त्यांना विरोध होत आहे.

शिवसेनेतही अस्वस्थता

डोंबिवलीत भाजप-शिवसेनेत वरवर कितीही मनोमीलन असल्याचे चित्र रंगविले जात असले, तरी शिवसेनेतील अनेक पदाधिकाऱ्यांना रवींद्र चव्हाण नको आहेत. महापालिका निवडणुकांमध्ये  चव्हाण आपल्या पराभवासाठी गल्लोगल्ली फिरतील याची कल्पना यापैकी अनेकांना आहे. डोंबिवली पश्चिमेतील सेनेच्या एका नगरसेवकाने मागील महिन्यापासून चव्हाण यांच्या विरोधात उघडलेली आघाडी त्याचे उदाहरण आहे. या शहरातील भाजपचा पारंपरिक मतदार केंद्र सरकारने घेतलेल्या काही निर्णयांमुळे कमालीचा सुखावला असला तरी दररोज जगताना आपल्या पदरात काय पडले, असा सवाल मनसेसोबत शिवसेनेचे काही पदाधिकारीही डोंबिवलीकरांच्या मनावर िबबवू लागले आहेत.

मतदार म्हणतात,

डोंबिवलीत चांगले रस्ते नाहीत. खड्डे, कचऱ्यामुळे घाणेरडे शहर म्हणून या शहराचा नावलौकिक होतो यासारखी लाजीरवाणी गोष्ट नाही. रस्ते, वीज, पाणी ही येथील रहिवाशांची गरज. ती पण चांगल्या पद्धतीने लोकप्रतिनिधी देत नसतील तर या शहराचे दुर्दैव आहे. नवीन पर्याय शोधण्याची आता वेळ आली आहे. – अ‍ॅड. शिरीष देशपांडे, ज्येष्ठ वकील, उच्च न्यायालय

पारंपरिक मतदार मतदान करतात म्हणून आपण निवडून येतो. त्यामुळे डोंबिवलीत विकासाची कामे करायची गरजच नाही अशी विद्यमान आमदारांची भावना झाली आहे. अन्य भागात एक आमदार आपल्या भागाचा चांगला कायपालट करू शकतो. मग डोंबिवलीचा विकास मंत्री असूनही रवींद्र चव्हाण का करू शकले नाहीत?– संदीप चांदसरकर, व्यावसायिक

तोडलेला कोपर पूल विनाविलंब पूर्ण होईल याकडे लक्ष असेल. याच ठिकाणी पर्यायी पूल बांधता येईल का यासाठी प्रयत्न करणार आहे. ४६५ कोटी निधीतून शहरातील रस्ते डांबरी, काँक्रीटचे करणार आहे.- रवींद्र चव्हाण, आमदार,