भाजपच्या पत्रामुळे शिवसेनेची कोंडी

ठाणे महापालिकेमार्फत दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या महापौर वर्षां मॅरेथॉन स्पर्धेवर होणारा खर्च टाळून तो पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दिला जावा, अशी मागणी करत भाजपने पुन्हा सत्ताधारी शिवसेनेला कोंडीत पकडले आहे. या स्पर्धेनिमित्ताने ठाण्यातील शिवसेना नेते मुंबईतील नेत्यांना व्यासपीठावर आणत दरवर्षी जोरदार शक्तिप्रदर्शन करत असतात. त्यामुळे पूरग्रस्तांचा मुद्दा उपस्थित करत भाजपने शिवसेनेवर अचूक निशाणा साधल्याची चर्चा येथील राजकीय वर्तुळात सुरू आहे.

ठाणे महापालिका आणि ठाणे जिल्हा अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनच्या माध्यमातून दरवर्षी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात येते. यंदा ही स्पर्धा १८ ऑगस्टला होणार असून स्पर्धेसाठी अवघे चार दिवस शिल्लक राहिले आहेत. या स्पर्धेच्या पाश्र्वभूमीवर ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांनी शहरातील मॅरेथॉन मार्गाचा दोन वेळा पाहाणी दौरा केला. दुसऱ्या दौऱ्यादरम्यान शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्डय़ांमुळे हैराण झालेल्या महापौर शिंदे यांनी दौरा अर्धवट सोडून अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली होती.

कोल्हापूर, सांगली, कोकण, रायगड तसेच ठाणे जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीत अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. या पूरग्रस्तांना शासन आणि विविध सामाजिक संस्थांकडून मदत केली जात आहे. त्यात महापालिकेची मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली तर नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होऊ शकतो. त्यामुळे यंदाची स्पर्धा रद्द करून त्यावर खर्च होणारी रक्कम पूरग्रस्तांना मदत म्हणून द्यावी, अशी मागणी भाजपचे गटनेते नारायण पवार यांनी केली असून या संदर्भात त्यांनी महापौर मीनाक्षी शिंदे यांना पत्र पाठविले आहे. मॅरेथॉन स्पर्धेची संपूर्ण तयारी झाली असून त्यासाठी जवळपास सर्वच निधी खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे चार दिवसांवर येऊन ठेपलेली स्पर्धा रद्द करणे शक्य नसल्याचे शिवसेनेच्या एका नेत्याने स्पष्ट केले.

स्पर्धा रद्द करण्याची मनसेची मागणी

एकीकडे महाराष्ट्र ओल्या दुष्काळामुळे पिचून गेलेला असताना ठाणे महापौर मॅरेथॉन आयोजित करणे हे असंवेदनशीलतेचे प्रतीक मानले जाईल. त्यामुळे ही स्पर्धा रद्द करून त्यावर होणाऱ्या वारेमाप खर्चाची रक्कम पूरग्रस्तांना द्यावी, अशी मागणी मनविसेचे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी महापौरांकडे पत्राद्वारे केली आहे.