भाजपवर टीका करत सेनेला चुचकारण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा प्रयत्न
बदलापूर : एकहाती सत्ता असलेल्या बदलापूर शहरात आणि आघाडीच्या जोरावर २५ वर्षे सत्तेत असलेल्या अंबरनाथमधील शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी नगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर चुचकारण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि गृहनिर्माण राज्यमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी बदलापुरात भाजप खासदार कपिल पाटील आणि आमदार किसन कथोरे यांच्यावर जोरदार टीका करत शहरातल्या नागरिकांना महाविकास आघाडीचा पर्याय देण्याच्या सूचना करत आघाडी करण्याचे संकेत दिले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे रविवारी अंबरनाथ आणि बदलापूर शहराच्या दौऱ्यावर होते. यावेळी अंबरनाथमध्ये पनवेलकर सभागृहात तर बदलापुरात गायत्री उद्यान अशा दोन ठिकाणी कार्यकत्र्यांचा आढावा मेळावा घेतला. दोन्ही ठिकाणी बोलताना दोन्ही शहरांतल्या सत्ताधारी शिवसेना पक्षाला झुकते माप देत नेत्यांनी शिवसेनेवर टीका करणे टाळले. त्याच वेळी केंद्रातल्या भाजप सरकारचा खरपूस समाचार घेतला. बदलापूर शहरातल्या मेळाव्यात जितेंद्र आव्हाड यांनी भाजपचे भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार कपिल पाटील आणि स्थानिक आमदार किसन कथोरे यांच्यावर घणाघाती टीका केली. या दोन्ही नेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने भरभरून दिले मात्र तरीही हे भाजपाच्या वळचणीला जाऊन बसले, असे यावेळी आव्हाड म्हणाले.
‘घरवापसी करणाऱ्यांना मागच्या बाकावर बसवा’
सत्तेच्या लालसेपोटी राष्ट्रवादी काँग्रसेला संकटाच्या काळात भाजपात जाणाऱ्या अनेकांना पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यायचे आहे. त्यांचे पक्षात स्वागत करा, मात्र किमान दोन वर्षे त्यांना मागच्या बाकावर बसवा, अशी विनंती जितेंद्र आव्हाड यांनी सुप्रिया सुळे यांना केली. संकटाच्या काळात पक्षाला साथ देणाऱ्यांना न्याय द्यावा लागेल, असेही यावेळी आव्हाड म्हणाले. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेणाऱ्या स्थानिक नेत्यांना काही काळ सत्तेशिवाय बसावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गटबाजीवर थेट निशाना
बदलापूर शहराचे शहर अध्यक्ष आशिष दामले आणि प्रदेश चिटणीस कालिदास देशमुख यांच्या कमालीचे वाद आहेत. त्यामुळे शहरात पक्षाचे दोन गट सातत्याने पहायला मिळतात. ही गटबाजी थांबवून एकत्र या, काय वाद असतील ते मिटवा आणि पक्ष वाढवा, असे थेट वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी केले, तर सभेच्या शेवटी या दोन्ही नेत्यांना हस्तांदोलन करण्याचा सल्ला देत आव्हाड यांनी त्यांच्यात समेट घडवून आणली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 23, 2021 12:00 am