जयेश सामंत-भगवान मंडलिक

२७ गावांतील नाराजीमुळे कल्याण ग्रामीण मतदारसंघात पराभव : – कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकांच्या तोंडावर केवळ शिवसेनेला धक्का देण्यासाठी २७ गावांमधील मतदारांना स्वतंत्र नगरपालिकेचे आश्वासन देणारी भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खेळी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेवरच उलटली असल्याचे चित्र निकालानंतर स्पष्ट होऊ लागले आहे. दिवा, २७ गावे तसेच नवी मुंबई महापालिकेतून वगळण्यात आलेली १४ गावे असा डोंबिवली, ठाण्यालगतचा ग्रामीण पट्टा मिळून बनलेल्या या मतदारसंघात शिवसेनेची मोठी ताकद असूनही केवळ मतदारांना गृहीत धरण्याची वृत्ती युतीच्या अंगलट आल्याचे दिसून आले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबाजी पाटील यांनी या पट्टय़ात आगरी कार्ड चालविण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता. २७ गावांमधील मतदारांमध्ये सुरुवातीपासून शिवसेनेविषयी काहीशी नाराजी असली, तरी केवळ संघटनात्मक ताकदीच्या जोरावर या भागात शिवसेना तग धरून आहे. लोकसभा निवडणुकीत या संपूर्ण पट्टय़ात आगरी कार्ड चालले नाही. त्यामुळे यंदाही येथील मूळ प्रश्नांना बगल देत शिवसेनेने लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या मताधिक्याचे गणित समोर ठेवून येथे रणनीती आखली. नेमकी तीच रणनीती पक्षाच्या अंगलट आल्याचे चित्र असून राजू पाटील यांच्या रूपाने या भागात मनसेच्या इंजिनाला इंधन मिळाल्याचे आता स्पष्ट होत आहे.

डोंबिवलीजवळील २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षांपूर्वी दिले होते. महापालिका निवडणुकांना सामोरे जाताना शिवसेनेला धक्का द्यायचा असेल तर २७ गावांमधील १४ जागांवर वरचष्मा मिळवावा लागेल असे गणित भाजपने आखले होते. त्यानुसार खासदार कपिल पाटील, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नरेंद्र पवार या त्रिकुटाने २७ गाव संघर्ष समितीच्या नेत्यांना हाताशी धरले. भाजपची सत्ता येताच २७ गावे महापालिकेतून वगळली जातील आणि या भागाची स्वतंत्र नगरपालिका केली जाईल, अशी घोषणा थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्याचा फायदा महापालिका निवडणुकीत भाजपला मिळाला. थोडेथोडके नव्हे तर तब्बल १० नगरसेवक या भागातून निवडून आले. त्यामुळे महापालिकेत शिवसेनेला टक्कर देता येईल असा आकडा भाजपला मिळाला.  मात्र महापालिकेत जसे शिवसेनेसोबत जुळू लागले तसे भाजप नेते संघर्ष समितीला टाळू लागले.  नगरपालिकेचे आश्वासन अर्धवट ठेवूनही लोकसभा निवडणुकीत मोठे मताधिक्य मिळाल्याने शिवसेना नेते विधानसभा निवडणुकीतही गाफील राहिले. नेमके याचा फटका शिवसेनेला बसल्याची चर्चा आहे.

दिव्यातही धक्का

ठाणे महापालिका हद्दीत दिवा आणि आसपासच्या परिसरात तब्बल आठ प्रभाग येतात. या प्रभागांमध्ये सर्वच्या सर्व नगरसेवक शिवसेनेचे आहेत. काही वर्षांपूर्वी येथे मनसेचे दोन नगरसेवक निवडून आले होते. पुढे ते दोघेही शिवसेनेत आले. त्यामुळे मनसे या भागात नावाला उरली आहे. या भागात प्रचारपत्रके वाटायलाही मनसेकडे कार्यकर्ते नव्हते. असे असताना राजू पाटील यांना दिवा परिसरात मोठय़ा प्रमाणावर मते पडल्याने शिवसेनेचे नेते अवाक झाले आहेत. या भागातील काँग्रेस, राष्ट्रवादी तसेच भाजपच्या स्थानिक मतदारांनीही मनसेचे इंजिन चालविल्याची चर्चा आहे.