25 April 2019

News Flash

सेना-भाजपमध्ये टोलसंघर्ष

आनंदनगरच्या टोलमुक्तीवरून शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा भाजपचा प्रयत्न

टोल संघर्ष समितीच्या माध्यमातून मंगळवारी आंदोलन करण्यात आले.  (छायाचित्र : दीपक जोशी)

आनंदनगरच्या टोलमुक्तीवरून शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा भाजपचा प्रयत्न

ठाणे : ठाणे, मुलुंडच्या वेशीवरील आनंदनगर टोल नाक्यावरून शिवसेना-भाजपने परस्परांना शह-काटशह देण्यास सुरुवात केली आहे. टोलमुक्तीच्या मागणीसाठी मंगळवारी भाजप नगरसेवकाने लाक्षणिक उपोषण केले. या आंदोलनातून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य करत शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे. शिवसेनेनेही हा केवळ स्टंट असल्याचा आरोप केला आहे.

ठाणे, मुलुंडच्या वेशीवरील आनंदनगर नाका टोलमुक्त करण्यासाठी भाजपचे नगरसेवक भरत चव्हाण यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. टोल नाक्यापासून ५ किमी त्रिज्येतील नागरिकांना टोल आकारू नये असा शासनाचा अध्यादेश आहे. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी नगरसेवक चव्हाण यांनी आंदोलन सुरू केले आहे. काही महिन्यांपूर्वी टोल नाक्यांवर या अध्यादेशाच्या प्रती वाटून टोलमुक्तीची मागणी करण्यात आली होती. त्यानंतरही टोलवसुली सुरूच राहिल्यामुळे त्यांनी टोल संघर्ष समितीच्या माध्यमातून मंगळवारी लाक्षणिक उपोषण केले. त्याला भाजपचे नगरसेवक मिलिंद पाटणकर, संजय वाघुले यांच्यासह अन्य नगरसेवकांनी हजेरी लावली.

निवडणुका तोंडावर आलेल्या असताना भाजप आणि शिवसेनेची अद्याप युती झालेली नाही. पाच वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेनेने दिलेल्या टोलमुक्तीच्या आश्वासनाचा मुद्दा उचलून भाजप नगरसेवक चव्हाण यांनी शिवसेनेला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सुरू केल्याची चर्चा शहरात सुरू आहे. दरम्यान, हे आंदोलन भाजपचे नसून टोल संघर्ष समितीचे आहे. त्यामध्ये सर्वच पक्षांचे कार्यकर्ते सहभागी असल्याचा दावा चव्हाण यांनी केला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या वेळी पालकमंत्री शिंदे यांनी टोलमुक्तीचे आश्वासन दिले होते. निवडून आल्यानंतर त्यांना राज्य रस्ते विकास महामंडळाचे मंत्रिपद मिळाले. त्यांनी आश्वासनाची पूर्तता करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल.

– भरत चव्हाण, भाजप नगरसेवक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली का, याकडे भाजप नगरसेवकांनी लक्ष द्यावे. त्यानंतर शिवसेनेला त्यांच्या आश्वासनाची आठवण करून द्यावी. आपण काही तरी करत असल्याचे वरिष्ठ नेत्यांना दाखविण्याच्या उद्देशाने ही स्टंटबाजी सुरू आहे.

– नरेश म्हस्के, शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख

First Published on February 6, 2019 2:50 am

Web Title: bjp target eknath shinde over cancellation of anand nagar toll naka