निवडणुकीच्या तोंडावर गावे वगळल्याने शिवसेनेची कोंडी
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुका तोंडावर असताना डोंबिवलीलगत असलेली २७ गावे पुन्हा एकदा महापालिकेतून वगळण्याचा निर्णय घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेची कोंडी केली असून, महापालिकेच्या आगामी निवडणुका शिवसेनेशी फारकत घेऊन स्वबळावर लढविण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. निवडणूक आयोगाने नुकत्याच जाहीर केलेल्या प्रभाग रचनेनुसार या गावांमध्ये तब्बल २१ प्रभागांची निर्मिती करण्यात आली आहे. कल्याण-डोंबिवलीत विकासकामांच्या आघाडीवर सपशेल अपयशी ठरलेल्या शिवसेनेसाठी गावांमधील ही प्रभाग रचना फलदायी ठरेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. या पाश्र्वभूमीवर भाजपमधील स्थानिक नेत्यांच्या आग्रहास्तव मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारित येणाऱ्या नगरविकास विभागाने सोमवारी या गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्याचा निर्णय जाहीर करून शिवसेनेला खुले आव्हान दिल्याची चर्चा आता रंगली आहे.
२७ गावांमधील एका मोठय़ा गटाचा महापालिकेत समाविष्ट होण्यास सुरुवातीपासून विरोध होता. असे असतानाही पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आग्रहास्तव तीन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी यासंबंधीचा निर्णय घेतला होता. विधानसभा निवडणुकीत या गावांमधून शिवसेनेला मोठे मताधिक्य मिळाले. तसेच गावांमधील मोकळ्या जमिनी आणि त्यालगत बडय़ा विकासकांच्या मोठय़ा गृहप्रकल्पांच्या उभारणीची शक्यता लक्षात घेता या भागात वर्चस्व गाजवू पाहणाऱ्या शिवसेनेला ही गावे महापालिकेत हवी होती. मात्र, गेल्या तीन महिन्यांत या भागातील राजकीय समीकरणे कमालीची बदलू लागली आणि गावांमधील संघर्ष समितीने मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला टोकाचा विरोध सुरू केला. दरम्यानच्या काळात निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या प्रभाग रचनेत कल्याण-डोंबिवलीतील १२२ प्रभागांपैकी तब्बल २१ प्रभागांची निर्मिती या गावांमध्ये करण्यात आली. ही प्रभाग रचना शिवसेनेच्या पथ्यावर पडेल, असेच बोलले जात होते. राज्यातील सत्तेत वाटेकरी असणारे भाजप-शिवसेनेने कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याची तयारी गेल्या दोन महिन्यांपासून सुरू केली आहे. डोंबिवली आणि कल्याण पश्चिमेत भाजपचे आमदार असून, कल्याण पूर्वेतील अपक्ष आमदार गणपत गायकवाड यांनाही भाजपने दरवाजे खुले केले आहेत. काहीही झाले तरी शिवसेनेसोबत युती करायची नाही, असा भाजपच्या या स्थानिक आमदाराचा आग्रह असून, गेल्या काही दिवसांपासून मुरबाडचे आमदार किसन कथोरे आणि खासदार कपिल पाटील अशा नेत्यांचा राबताही कल्याण-डोंबिवलीत वाढला आहे.
भाजपचे मनसुबे लक्षात येताच खडबडून जागे झालेल्या शिवसेनेनेही काँग्रेस, राष्ट्रवादीतील नाराज नगरसेवकांना गळाला लावण्याचा धडाका लावला आहे. भाजपने शिवसेनेसोबत चर्चा टाळून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींची प्रक्रियाही सुरू केली आहे. या परिस्थितीत निवडणुका स्वतंत्रपणे लढवायचे हे स्पष्ट होऊ लागल्याने कल्याण पश्चिमेचे आमदार नरेंद्र पवार आणि किसन कथोरे यांनी कोणत्याही परिस्थितीत २७ गावे महापालिकेतून वगळा, असा आग्रह मुख्यमंत्र्यांकडे धरला होता, असे बोलले जाते.
अवघ्या तीन महिन्यांत गावांच्या समावेशाचा निर्णय मागे घेताना मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री एकनाथ िशदे यांना ‘कात्रजचा घाट’ दाखविल्याची चर्चा आता रंगली आहे.
दरम्यान, गेली २० वर्षे हे लोक तुम्हाला गृहीत धरत आहेत, ही कुरघोडी सुरू आहे, किमान आता तरी जागे व्हा, अशा अर्थाचे व्हॉट्सअ‍ॅप संदेश पाठवून मनसेने आपली याबाबतची प्रतिक्रिया नोंदविली आहे.

विकास केंद्राबाबत पालकमंत्री अंधारात
मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या नुकत्याच झालेल्या एका बैठकीत २७ गावांमध्ये कल्याण विकास केंद्र (ग्रोथ सेंटर) उभारण्यासाठी सुमारे एक हजार कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला. या प्रकल्पाची घोषणा करत असताना पालकमंत्री एकनाथ िशदे यांना पूर्णपणे अंधारात ठेवण्यात आले होते. या घडामोडींमुळे भाजप-शिवसेनेतील दरी आणखी रुंदावू लागली आहे.

राजकारण नाही..
२७ गावांच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे. महापालिकेतून वगळण्याची संघर्ष समितीची अनेक वर्षांची मागणी होती आणि नगरपालिका स्थापन करून ती पूर्ण करण्यात आली आहे. यामध्ये शिवसेनेला शह देणे किंवा अन्य कोणतेही राजकारण नाही.
– नरेंद्र पवार, भाजप आमदार

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुका शिवसेना-भाजपने एकत्रित लढवाव्यात, अशी आमची इच्छा होती. मात्र २७ गावांचा निर्णय घेऊन मुख्यमंत्र्यांनी धरसोड वृत्तीचे दर्शन घडविले आहे. हा निर्णय प्रशासकीय नाही, तर राजकीय आहे. त्यामुळे निवडणूक िरगणात भाजपशी दोन हात करण्यास आम्ही सज्ज आहोत.
– शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्याची प्रतिक्रिया

२७ गावे महापालिकेतून पुन्हा हद्दपार
मुंबई : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील २७ गावांची रडकथा कायम असून, ही गावे एकदा वगळली, परत समाविष्ट केली आणि आता पुन्हा वगळण्याची प्रक्रिया राज्य शासनाने सुरू केली आहे. ही गावे राजकीयदृष्टय़ा अडचणीची ठरू शकतात याचा भाजपच्या धुरीणांना अंदाज आल्याने ती वगळण्याची अधिसूचना सोमवारी घाईघाईत काढण्यात आली. परिणामी, पुढील महिन्यात होणाऱ्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीचा घोळ होणार आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतून २७ गावे १४ वर्षांपूर्वी वगळण्यात आली होती. तीन महिन्यांपूर्वी या गावांचा पुन्हा महापालिकेत समावेश करण्यात आला. ही गावे शिवसेनेसाठी फायदेशीर ठरू शकतात याचा भाजपच्या स्थानिक नेत्यांना अंदाज आला. यामुळेच पुन्हा ही गावे वगळण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. याबाबतची अधिसूचना सोमवारी काढण्यात आली असली तरी ही सारी प्रक्रिया पूर्ण होण्यास दोन महिन्यांचा कालावधी लागू शकतो.
निवडणूक प्रक्रिया सुरू, पण..
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक पुढील महिन्यात असून, पुढील आठवडय़ात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याची प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाने सुरू केली आहे. परंतु २७ गावे वगळल्याने या निवडणुकीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कल्याण महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक होऊन ११ नोव्हेंबरपूर्वी नवीन सभागृह अस्तित्वात येणे बंधनकारक आहे. त्यामुळे निवडणुकीची प्रक्रिया आयोगाने पूर्वीच सुरू केली असून, आरक्षण सोडत तसेच मतदार याद्या तयार झाल्या आहेत. त्यामुळे कोणत्याही क्षणी निवडणुकीची घोषणा होणार असल्याने ही गावे महापालिकेतून वगळू नयेत, असे पत्र आयोगाने राज्य सरकारला यापूर्वीच पाठविले होते. मात्र तरीही सरकारने ही गावे वगळण्याची प्राथमिक अधिसूचना काढली आहे. नियमानुसार संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय ही गावे महापालिकेतून बाहेर पडणार नसल्याने आणि प्रभाग रचना अंतिम झाल्याने तेथे निवडणूक घेतली जाईल. सध्या हे प्रकरण न्यायालयात गेले असून, तेथेही आयोग आपली भूमिका मांडेल, असे राज्य निवडणूक आयोगातील सूत्रांनी सांगितले. तर सरकारचा निर्णय अजून आपल्यापर्यंत पोहोचलेला नाही. उद्या, मंगळवारी आदेश पाहून आयोग आपली भूमिका स्पष्ट करेल, असे राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी सांगितले. यापूर्वी या २७ गावांमधील मतदारांनी दोनदा महापालिका निवडणुकीवर बहिष्कार घातला होता.

वगळलेली गावे
घेसर, हेदुटणे, उंब्रोली, भाल, द्वारली, मणेरे, वसार, आशेळ, नांदिवलीतर्फे आंबरनाथ, आडिवली ढोकली, दावडी, चिंचपाडा, पिसवली, गोळीवली, सोनारपाडा, माणगाव, कोळे, निळजे, काटई, उसरघर, घारिवली, संदप, भोपर, नांदिवली, पंचानंद, आसदे, सागाव, देसलेपाडा.