News Flash

युतीपूर्वीच भाजपकडून रिपाइंला १२ जागा

भाजपच्या स्थानिक कार्यकारिणीने रिपाइंसाठी १२ जागा जाहीर करत शिवसेनेसह ओमी कलानी यांनाही एकप्रकारे धक्का दिला.

उल्हासनगरात शिवसेना-भाजपमध्ये नवा संघर्ष

ओमी कलानी यांच्या भाजपप्रवेशावरून एकीकडे संभ्रम कायम असताना आणि उल्हासनगर महापालिका निवडणुकीत युती करायची की नाही, याचा निर्णय बाकी असतानाच, भाजपच्या नेतेमंडळींनी पालिका निवडणुकीतील १२ जागा रिपाइंला देत असल्याचे जाहीर केले. भाजपच्या नेत्यांनी कोणत्याही चर्चेविना घेतलेल्या या निर्णयामुळे शिवसेनेत प्रचंड नाराजी असून त्यामुळे पालिका निवडणुकीत युती तुटण्याची चिन्हे आहेत.

केंद्र आणि राज्यातील राजकीय परिस्थिती लक्षात घेता यंदाच्या महापालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्षासोबत युती व्हावी, अशी भूमिका भाजपचे स्थानिक नेते सुरुवातीपासून मांडत होते. उल्हासनगर महापालिकेत शिवसेना आणि भाजपची सत्ता आहे. शहरात दोन्ही पक्षांची ताकदही सारखी असल्याने कलानी कुटुंबीयांसोबत दोन हात करण्यासाठी युती केल्याशिवाय पर्याय नाही, असा सूर दोन्ही पक्षांतील जाणकारांमधून व्यक्त होत आहे. त्यामुळे युतीसंबंधीची प्राथमिक बोलणी या दोन्ही पक्षांकडून सुरू झाली आहेत. असे असताना सोमवारी भाजपच्या स्थानिक कार्यकारिणीने रिपाइंसाठी १२ जागा जाहीर करत शिवसेनेसह ओमी कलानी यांनाही एकप्रकारे धक्का दिला. रिपब्लिकन पक्ष हा भाजपचा नैसर्गिक मित्र असून शिवसेनेशी युती झाली तरीही रिपाइंला योग्य न्याय दिला जाईल, असे पक्षाचे जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी यांनी या वेळी जाहीर केले. रिपब्लिकन पक्षाने येत्या निवडणुकीसाठी १५ जागांची मागणी केली होती. त्यातील १२ जागा आज जाहीर करण्यात आल्या, तसेच उर्वरित जागा येत्या काही दिवसांत चर्चेतून जाहीर करण्यात येतील, असेही या वेळी स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र युतीबाबत निर्णय चर्चेच्या पातळीवर असतानाच भाजपने अशाप्रकारे रिपाइंसाठी १२ जागा जाहीर केल्याने शिवसेनेच्या गोटातून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. शिवसेनेशी भाजपने युतीसोबत चर्चा सुरू केली होती, मात्र ती जागावाटपाच्या स्तरापर्यंत जाण्याआधीच भाजपने जागा जाहीर केल्याने त्याचा शिवसेनेसोबतच्या युतीवर परिणाम करेल, अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे. याबाबत शिवसेनेचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी या भाजपच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. एकीकडे युतीची चर्चा करायची आणि दुसरीकडे शिवसेनेला अंधारात ठेवून जागा जाहीर करायच्या हे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच गेल्या निवडणुकीतील जागावाटपाच्या सूत्राप्रमाणेच जागावाटप व्हावे यासाठी आम्ही आग्रही असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच शिवसेना-भाजप युती झाली तर रिपाइंला सोडण्यात येणाऱ्या जागा भाजपने आपल्या कोटय़ातून द्याव्यात, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

या जागा रिपाइंसाठी

प्रभाग क्रमांक ४ मध्ये २ जागा, प्रभाग ७ मध्ये ३, तर प्रभाग ८ मध्ये १ जागा, प्रभाग १२ मध्ये २ जागा, तर प्रभाग १८ मध्ये ३ जागा आणि अन्य एक जागा. आणखी तीन ठिकाणी रिपाइंसाठी जागा सोडण्यावर विचार सुरू असून चर्चेनंतर त्याबाबत निर्णय घेतला जाईल, असेही भाजपतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. गेल्या निवडणुकीत शिवसेना ३३, भाजप ३३ आणि रिपाइं १२ असे जागावाटप करण्यात आले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2017 2:36 am

Web Title: bjp to give 12 seats to rpi for umc election
Next Stories
1 जिल्ह्यतील मतदारांत घट
2 ओमी कलानींच्या भाजप प्रवेशात स्थानिकांचा खोडा
3 पर्यावरणाभिमुख प्रकल्पांची ठाण्यात रुजवण
Just Now!
X