विधान परिषद निवडणुकीच्या पाठिंब्याच्या मोबदल्यात पालिकांत महत्त्वाची पदे
विधान परिषद निवडणुकीतील विजयासाठी जंगजंग पछाडत असलेल्या शिवसेनेने अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही नगरपालिकांमध्ये भाजपला सत्तेत सहभागी करून घेण्याची तयारी दर्शवल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. बदलापूर नगरपालिकेत तर भाजपला नगराध्यक्षपद सोडण्यासही पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनुकूलता दर्शवल्याचे समजते. विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर डोंबिवली जिमखाना येथे युतीच्या स्थानिक नेत्यांची एक बैठक पार पडली. या बैठकीत अंबरनाथ, बदलापूर नगरपालिकेतील सत्तेचा वाटा मिळायला हवा, अशी स्पष्ट भूमिका भाजप नेत्यांनी मांडली. ही मागणी शिवसेनेने मान्य केली असून विधान परिषद निवडणुकीचे मतदान पूर्ण होताच त्यासंबंधीची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.
येत्या जून महिन्यात विधान परिषदेच्या एका जागेसाठी ठाणे आणि पालघर जिल्ह्य़ातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधून मतदान पार पडणार आहे. ही निवडणूक शिवसेना-भाजपने एकत्रित लढविण्याचा निर्णय घेतला असला तरी स्थानिक पातळीवर या दोन्ही पक्षातील कुरबुरींमुळे शिवसेनेत कमालीची अस्वस्थता आहे. कल्याण डोंबिवली महापालिका तसेच अंबरनाथ, बदलापूर नगरपालिकेची निवडणूक या दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे लढवली. बदलापुरात भाजपकडे किसन कथोरे यांच्यासारखा मातब्बर नेता असतानाही शिवसेनेने एकहाती सत्ता प्रस्थापित केली. अंबरनाथमध्येही शिवसेनेने भाजपला चारीमुंडय़ा चीत केले. या पराभवाची सल भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये आहे. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीचे निमित्त साधून भाजप नेत्यांनी शिवसेनेवर दबाव वाढविण्यास सुरुवात केली असून या दोन्ही नगरपालिकांमध्ये सत्तेचा वाटा द्या अशी मागणी लावून धरली आहे. अंबरनाथ आणि बदलापूर पालिकेत भाजप विरोधी बाकांवर आहे. त्यामुळे युतीचा धर्म फक्त भाजपनेच पाळायचा का, असा सवालही केला जात होता. दरम्यान, भाजपमधील वाढती अस्वस्थता लक्षात घेऊन शिवसेना नेत्यांनी डोंबिवली जिमखाना येथे तातडीने बैठक बोलवून अंबरनाथ, बदलापूर नगरपालिकेतील सत्तेत भाजपला सामावून घेण्याचा शब्द दिल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बदलापुरात अडीच वर्षांसाठी भाजपला उपनगराध्यक्षपद देण्यात येणार आहे. त्यासह शिक्षण समिती आणि आणखी एक समिती देण्याचे बैठकीत मान्य झाले आहे. अंबरनाथमध्येही भाजपला सत्तेत सहभागी करून घेतले जाईल, असे आश्वासन शिवसेना नेत्यांनी दिले आहे. येत्या ३ जून रोजी मतदान झाल्यानंतर यासंबंधी अधिकृत घोषणा केली जाईल, अशी भूमिका शिवसेना नेत्यांनी घेतली आहे.