मीरा-भाईंदरमध्ये महापौरांसमोरच पक्षाच्या दोन गटांत हाणामारी; धार्मिक कार्यक्रमाला कोण जाणार यावरून वाद

‘पार्टी विथ डिफरन्स’, ‘शिस्तीचा पक्ष’ असा टेंभा मिरवणाऱ्या भारतीय जनता पक्षातील (भाजप) कार्यकर्त्यांच्या दोन गटांत महापालिकेच्या आवारात हाणामारी झाल्याने पक्षातील गटबाजीदेखील आता चव्हाटय़ावर आली आहे. भाजपचे नगरसेवक अ‍ॅड. रवी व्यास यांचे कार्यकर्ते आणि पक्षाचा युवा पदाधिकारी विनोद शिंदे यांच्यात शुक्रवारी संध्याकाळी हाणामारी झाली. विशेष म्हणजे महापौर गीता जैन यांच्या समोरच हा हिंसक संघर्ष सुरू होता. मात्र ही हाणामारी एक निमित्त असून गेली अनेक दिवस पक्षातील सुप्त संघर्ष उघड झाला आहे.

different move in alliance has increased uneasiness in the Shinde Sena
मित्रपक्षाच्या ‘रसदी’मुळे शिंदे सेनेत अस्वस्थता
Pimpri, Traders camp, Mahayuti,
पिंपरी : कॅम्पातील व्यापाऱ्यांचा महायुतीला पाठिंबा; महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरेंना धक्का
Proposal of friendly fight in Bhiwandi rejected by Congress seniors
भिवंडीत मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव काँग्रेसच्या वरिष्ठांकडून अमान्य
Gadchiroli, Congress
गडचिरोली : घटक पक्षातील नाराजी व जातीय समिकरणाचे काँग्रेसपुढे आव्हान !

भाजपमधील जुने कार्यकर्ते, पदाधिकारी मागे पडून आता पक्षात नव्याने आलेल्यांचा सध्या जास्त बोलबाला आहे. महापालिकेत भाजप सत्तेत असल्याने सत्तेच्या लोभाने अनेक हवशे-नवशे पक्षात दाखल झाले आहेत. यातच भाजपमध्ये सध्या अघोषित दोन गट तयार झाले आहेत. एक आमदार नरेंद्र मेहता यांचा आणि दुसरा महापौर गीता जैन यांचा.

दोन्ही गटांतील स्पर्धा, इर्षां आतापर्यंत चार भिंतींआड तथा एकमेकांच्या गटावर कुरघोडी करण्याइतपत मर्यादित होती. परंतु महापालिकेत दिवसाढवळ्या घडलेल्या राडय़ाने हा संघर्ष आता रस्त्यावर येऊन पोहोचला आहे. एका धार्मिक कार्यक्रमाला महापौरांच्या सोबत कोण जाणार यावरून हा वाद उद्भवला. महापौर गीता जैन या नगरसेवक रवी व्यास यांच्यासोबत कार्यक्रमाला जात असताना युवा पदाधिकारी विनोद शिंदे याने केवळ महापौरांनाच कार्यक्रमाला प्रवेश असल्याचे सांगितल्याने व्यास यांच्या कार्यकर्त्यांचा पारा चढला आणि त्यांनी शिंदे याला महापौरांच्या समक्षच यथेच्छ बदडून काढले. शिंदेही आक्रमक झाला आणि त्याने व्यास यांचा उजवा हात असलेल्या दरोगा पांडे याचे नाक फोडून त्याला रक्तबंबाळ केले. या वेळी अपशब्दांचाही मुबलक वापर झाला. महापौरांनी वेळीच हस्तक्षेप करून दोन्ही गटांना शांत केल्याने तेवढय़ावरच निभावले. पक्षाच्या पातळीवर दोन्ही गटांची समजूत काढण्याचा प्रयत्न झाला, परंतु शिंदे याने नगरसेवक रवी व्यास यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

संघर्ष तीव्र होण्याची शक्यता

या घटनेने मीरा-भाईंदर भाजपची लक्तरे वेशीवर टांगली गेल्याने जुन्या कार्यकर्त्यांत मात्र तीव्र नाराजी पसरली आहे. पक्षात नव्याने दाखल झालेल्यांमुळे पक्षातील वातावरण बिघडत चालले असल्याचेही अनेक पदाधिकारी बोलून दाखवत आहेत. काही महिन्यांपूर्वी भाजपचे माजी नगरसेवक ओमप्रकाश गाडोदिया यांनाही पक्षाच्याच काही कार्यकर्त्यांकडून दमदाटी व धक्काबुक्की करण्यात आली होती. महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक अवघ्या सात महिन्यांवर येऊन ठेपली आहे. महापालिकेत स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचा दावा पक्षाचे पदाधिकारी करू लागले आहेत. या पाश्र्वभूमीवर निवडणूक जशी जवळ येईल, तसा पक्षांतर्ग गटबाजीला ऊत येऊन कार्यकर्त्यांमधील संघर्ष अधिक तीव्र होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पक्षात गटबाजी नाही

पक्षात आमदार अथवा महापौर अशी कोणतीही गटबाजी नाही. सर्व एकदिलाने पक्षाचे काम करत आहेत. महापालिकेत घडलेला प्रकार निव्वळ गैरसमजुतीमधून घडला आहे.

– हेमंत म्हात्रे, जिल्हाध्यक्ष, मीरा-भाईंदर भाजप