उल्हासनगरात भाजपच्या प्रचारात कलानींची छबी

कलंकित नेते पप्पू कलानी यांना चार हात लांब ठेवत असल्याचा आव आणत त्यांचे पुत्र ओमी यांच्यासोबत आघाडीचा डाव खेळणाऱ्या भाजपने उल्हासनगर महापालिका निवडणुकीच्या प्रचारात मात्र कलानी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रांगेत आणून ठेवले आहे. भाजपच्या प्रचारफलकांमध्ये मोदी यांच्यासोबत पप्पू कलानी यांचेही छायाचित्र वापरण्यात येत असल्याने पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.

नरेंद्र मोदी यांच्या लाटेतही उल्हासनगरात पप्पू कलानी यांची पत्नी ज्योती राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आल्याने महापालिका निवडणुकांना सामोरे जाताना भाजपचे धाबे दणाणले होते. शिवसेनेसोबत दोन हात करत येथील महापालिकेत सत्ता स्थापन करायची झाल्यास कलानी कुटुंबीयांसोबत युती केल्याशिवाय पर्याय नाही, अशी उपरती राज्यमंत्री रवींद्र  चव्हाण यांच्यासह भाजपमधील एका मोठय़ा गटास झाल्याने गेल्या काही महिन्यांपासून ओमी यांच्या प्रवेशाची चर्चा सुरू झाली होती. मात्र ओमी यांना थेट प्रवेश दिला गेल्यास भाजपची प्रतिमा मलीन होईल आणि इतर महापालिकांमध्ये त्याचा पक्षाला फटका बसेल असा युक्तिवाद दुसऱ्या एका गटाकडून करण्यात आला. ठाण्यात सुधाकर चव्हाण यांच्या प्रवेशासाठी हरकत घेणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओमी यांच्यासोबत हातमिळवणी करण्यास भाजप नेत्यांना रोखले नाही.

असे असताना भाजपने शहरात सुरूकेलेल्या प्रचारात जागोजागी नरेंद्र मोदी यांच्यासोबत कुख्यात गुंड आणि जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या पप्पू कलानी याचा फोटो छापल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. उल्हासनगर प्रभाग क्रमांक तीन येथील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी छापण्यात आलेल्या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,

राज्यातील प्रमुख नेते तसेच कुमार आयलानी, ओमी कलानी यांच्या रांगेत आता पप्पू कलानी याचाही फोटो छापण्यात आला आहे. त्यामुळे पारदर्शकता आणि स्वच्छ चारित्र्याचे दाखले देत मिरवणाऱ्या भाजपचा खरा चेहरा समोर आल्याची टीका शिवसेनेने सुरू केली आहे.

पप्पू कलानी याच्या नावाने मते मागत सत्तेची चावी मिळवण्याचा प्रकार सध्या सुरू असून टीम ओमी कलानीच्या सोबत भाजपच्या काही उमेदवारांनीही पप्पू नावाजा गजर सुरू केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

यापूर्वीही मतांचा जोगवा

विधानसभा निवडणुकीत प्रचार संपण्याच्या अवघे पाच दिवस शिल्लक असताना पप्पू कलानी यांना जामिन मिळाला होता. त्या वेळी बाहेर आलेल्या पप्पू कलानीने रोड शो करत प्रचार केला होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा फायदा मिळाला होता, असा दावा केला जातो. त्यामुळे यंदाही भाजप उमेदवारांच्या प्रचारात पप्पूचे नाव ठळक अक्षरात छापले जात असल्याचे बोलले जाते. यासंबंधी जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही तो होऊ शकला नाही.