स्वत:कडे श्रेय घेण्यासाठी जोरदार फलकबाजी

ठाणे शहरात गेल्या दीड-दोन वर्षांत महापालिकेच्या माध्यमातून झपाटय़ाने सुरू झालेल्या विकासकामांवर आरूढ होत सत्ताधारी शिवसेनेने गेल्या आठवडय़ात शहरभर केलेल्या वातावरणनिर्मितीतून बेदखल झालेल्या भाजपने उशिरा का होईना, श्रेयवादाच्या लढाईत उडी घेतली असून ठाणे मेट्रो, वायफाय सिटी आणि सीसी टीव्ही प्रकल्पांची संकल्पना आमचीच असल्याचा दावा करत बुधवारी शिवसेनेला आव्हान देण्याचा प्रयत्न केला. हे तिन्ही प्रकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या संकल्पनेतून साकारले जात असल्याची फलकबाजी भाजपने आचारसंहिता जाहीर होण्याच्या पूर्वसंध्येला सुरू केली. मुख्यमंत्र्यांच्या गुरुवारी होणाऱ्या ठाणे दौऱ्यातही या प्रकल्पांचा डंका पिटण्याची तयारी भाजपच्या गोटात सुरू होती.

ठाणे महापालिकेत शिवसेना-भाजपची एकत्रित सत्ता असली तरी येथील विकासकामांचे श्रेय भाजपला मिळणार नाही याची पुरेपूर काळजी शिवसेनेचे नेते घेत असतात. ठाणे शहराला मुंबईशी जोडणारा मेट्रो प्रकल्प सुरू करावा यासाठी शिवसेनेचे नेते गेल्या काही वर्षांपासून आक्रमकपणे मागणी लावून धरत आहेत. हा प्रकल्प मंजूर होताच, शिवसेनेच्या नेत्यांनी याचे श्रेय स्वत:कडे घेतले होते. त्यावेळी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी मौन धारण केले होते. याखेरीज सीसीटीव्ही आणि वायफाय प्रकल्पांची घोषणाही मुख्यमंत्र्यांनीच केली. आयुक्त जयस्वाल यांनीही या घोषणांची अंमलबजावणी करण्यासाठी तातडीने पावले उचलली. परंतु, या तिन्ही प्रकल्पांचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याचा पालिका प्रशासनाचा प्रयत्न अपयशी ठरला. विशेष म्हणजे, भाजपच्या नेतेमंडळींनीही यासाठी पुढाकार घेतला नाही. त्यामुळे ‘ठाण्याचे विकासकर्ते आम्हीच’ असा प्रचार करण्यात सेनानेते यशस्वी ठरले.

श्रेयवादाच्या या लढाईत शिवसेना आघाडीवर असल्याचे दिसत असतानाच बुधवारी भाजपने शहरभर लावलेल्या फलकांवर मेट्रो, सीसीटीव्ही, वायफाय या तिन्ही प्रकल्प झळकू लागले आहेत. गुरुवारी होणाऱ्या भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीच्या निमित्ताने का होईना, भाजपने आक्रमक प्रचाराला सुरुवात करत या प्रकल्पांचे श्रेय मुख्यमंत्र्यांचे असल्याची वातावरणनिर्मिती केल्याचे पाहायला मिळाले.  पाच वर्षांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेने ‘माझे ठाणे खणखणीत नाणे’ असे घोषवाक्य तयार करत ठाणेकरांशी भावनिक नाते सांगण्याचा प्रयत्न केला होता. भाजपने शिवसेनेचे हेच घोषवाक्य हेरत ‘माझा ठाणे मेट्रो ठाणे’ असा प्रचार बुधवारपासून सुरू केला आहे.

श्रेय कुणाचे? आयुक्तांचे

महापालिकेत शिवसेनेची सत्ता असली तरी गेल्या दीड वर्षांपासून येथील कारभारावर आयुक्त संजीव जयस्वाल यांचा एकहाती वरचष्मा राहिला आहे. जयस्वाल यांनी विनंती करताच आयुक्त निवासस्थानी जाणे, महापालिका मुख्यालयास भेट देणे अशा कृतीतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शिवसेनेच्या सत्तेत जयस्वाल यांचे महत्व कसे वाढेल याची पुरेपूर काळजी घेतली. त्यामुळे शिवसेनाच नव्हे तर इतर पक्षांचे लोकप्रतिनिधीही जयस्वाल यांना वचकून असल्याचे चित्र पाहायला मिळाले. ठाण्यातील रस्ते रुंदीकरण, बेकायदा बांधकामांवर कारवाई, वायफाय, सीसी टीव्ही, तलावांचे सौदर्यीकरण यासारख्या प्रकल्पांच्या माध्यमातून गेल्या दीड वर्षांत जयस्वाल अधिक चर्चेत राहिले.