‘आगामी महापौर भाजपचा व्हावा’, अशी कार्यकर्त्यांची इच्छा

ठाणे महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली असताना शहरातील भाजप नेत्यांनी आतापासूनच ‘एकला चालो रे’चा राग आवळण्यास सुरुवात केली असून ‘ठाण्याचा महापौर भाजपचा व्हावा हीच कार्यकर्त्यांची इच्छा आहे’, अशी स्पष्ट भूमिका पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष संदीप लेले यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत मांडली. शिवसेनेसोबत युती न करता स्वबळावर निवडणूक लढवण्याची कार्यकर्त्यांची इच्छा पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवण्यात येईल, असेही ते म्हणाले. विधानसभेच्या निवडणुकीत ठाणे शहर आणि कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात पूर्वीपेक्षा पक्षाची मते वाढली आहेत. त्यामुळे कोणतेही आव्हान पेलण्यास पक्ष समर्थ आहे, असे सांगत भाजप पदाधिकाऱ्यांनी सेनेला डिवचण्याचाही प्रयत्न केला.

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत भाजपसोबत युती करण्यासाठी शिवसेना नेते कमालीचे आग्रही होते. मात्र, भाजपने स्वबळावर ठाम राहात निवडणूक लढवली व ४२पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणले. या यशामुळे पक्षाचा आत्मविश्वास वाढला असून ठाणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीतही ‘एकला चालो रे’ची भूमिका भाजप नेते, पदाधिकारी घेऊ लागले आहेत. या पाश्र्वभूमीवर भाजपचे ठाण्यातील नवनियुक्त अध्यक्ष संदीप लेले यांनी ठाण्यातही भाजपचा महापौर व्हावा, अशी इच्छा व्यक्त करत आगामी संघर्षांचे बिगूल फुंकल्याची चर्चा आता रंगली आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये ठाण्यातील चारही मतदारसंघात पक्षाच्या उमेदवारांना जवळपास दोन लाखांच्या आसपास मते मिळाली आहेत. कोपरी मतदारसंघातील ५५ बूथवर तर ठाणे शहर मतदारसंघातील २०० बूथवर पक्षाला सर्वाधिक मते मिळाली असून त्यामुळे या ठिकाणी पक्षाची ताकद वाढल्याचा दावा लेले यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना केला. दिवा भागातही पक्षाला चांगली पसंती मिळत असून तिथेही पक्ष चांगल्या प्रकारे वाढत आहे, असे ते म्हणाले. कोणतीही निवडणूक स्वबळावरच लढली जाते, असे ते म्हणाले. आमच्या पक्षाचा महापौर व्हावा, अशी सर्वच कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचे सांगत त्यांनी निवडणुका स्वतंत्र लढण्याचे संकेत दिले.

महापालिकेतील पद वाटपांबाबत मित्रपक्ष शिवसेनेसोबत यापूर्वीच चर्चा झाली असून त्यामध्ये एक वर्षांसाठी स्थायी समितीचे पद भाजपला देण्याचे ठरले होते. हे पद भाजपला चार वर्षांत मिळालेले नाही. त्यामुळे शिवसेना आपला शब्द पाळेल आणि यंदा स्थायी समिती पद भाजपला देतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.