ठाणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत शिवसेनेशी युती न करण्याचा निर्धार भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आला आहे. भाजपचे स्थानिक आमदार संजय केळकर यांनी एबीपी माझा वृत्तवाहिनीशी बोलताना  यासंदर्भात माहिती दिली. आगामी पालिका निवडणुकांसाठी आम्ही शिवसेनेकडे युतीचा कोणताही प्रस्ताव घेऊन जाणार नाही. तसेच शिवसेनेकडून युतीचा प्रस्ताव आल्यास त्याचाही विचार करणार नाही, असे केळकर यांनी सांगितले. भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांना शिवसेनेसोबत युती करून लढण्याची इच्छा नाही. गेल्या वर्षभरात पक्षाचा ज्याप्रकारे पक्षाचा विस्तार झाले आहे त्यावरून आगामी निवडणूक स्वबळावर लढवावी, अशी कार्यकर्त्यांची सामूहिक इच्छा असल्याचे केळकर यांनी सांगितले. सद्यस्थितीनुसार ठाणे पालिकेच्या एकुण १३० जागांपैकी केवळ आठ ठिकाणी भाजपचे तर ५७ ठिकाणी सेनेचे नगरसेवक आहेत. मात्र, तरीदेखील यावेळी ठाण्यात भाजपच्या कार्यकर्त्यांकडून स्वबळावर लढण्याचा आग्रह धरला जात आहे.  मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठीही दोन्ही पक्ष एकत्र येणार का, याबाबतही अद्यापपर्यंत संभ्रम आहे.

सत्तेत आल्यापासून शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्ये सातत्याने कुरबुरी सुरू आहेत. यापूर्वी झालेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये युतीबाबत चर्चेचे अधिकार स्थानिक पातळीवर देण्याची भूमिका भाजपने घेतली होती. ज्या ठिकाणी भाजपची ताकद कमी आहे, तेथे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला टक्कर देण्यासाठी शिवसेनेची मदत घ्यायची व जेथे गरज नसेल, तेथे स्वबळावर लढायचे, असा भाजपचा आतापर्यंतचा पवित्रा राहिलेला आहे. या निवडणुकांमध्ये भाजपला चांगले यशही मिळाले होते. त्यामुळे आता ठाणे आणि मुंबईतही हाच कित्ता गिरवला जाणार का, हे पाहणे औत्स्युकाचे ठरेल. शिवस्मारक भूमिपूजनाला मुंबईसह राज्यातून मिळालेला प्रतिसाद पाहून भाजपचा आत्मविश्वास दुणावला असून मुंबईसह काही महापालिकांमध्ये स्वबळावर लढण्यासाठी गेल्या आठवडाभरापासून त्रयस्थ संस्थेमार्फत भाजपने सर्वेक्षण सुरू केले आहे. शिवसेनेला गाफील ठेवण्यासाठी युतीच्या चर्चेचे गुऱ्हाळ या आठवडय़ात सुरू केले जाणार आहे. मात्र नोटाबंदीविरोधात शिवसेनेची आक्रमक भूमिका, गोव्यात भाजपविरोधात आघाडी हे मुद्दे युतीत अडसर ठरत आहेत. मुंबई महापालिकेसह काही महापालिका व २६ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची घोषणा राज्य निवडणूक आयोगाकडून पुढील आठवडय़ात होण्याची शक्यता असून राजकीय हालचालींना वेग येणार आहे. भाजपकडून शिवसेनेला युतीसाठी चर्चेचा प्रस्ताव देण्यात येत असून काही नेत्यांमध्ये अनौपचारिक चर्चा सुरू आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे युती करण्यासाठी अनुकूल असले तरी पंतप्रधान मोदी व अमित शहा यांचा मात्र ठाकरे यांच्याबाबत आकस आहे.