News Flash

सृजनाची फॅक्टरी : अंतर्मुख करणारी ब्लॅक कॉमेडी

एकांकिकेच्या तालिमीच्या वेळी या तिघांची रोज भेट होत राहायची.

‘मोरया थिएटर्स’

मराठी रंगभूमीवर युवा पिढी सातत्याने नवेनवे प्रयोग करीत आहे. मोरया थिएटर्स त्यापैकी एक. विविध कलांचा वापर चपखलपणे करून नाटय़ परिणाम साधण्याची त्यांची क्लृप्ती रसिकांना खूपच आवडली. केवळ मॅडचॅप कॉमेडी न करता हसता हसता अंतर्मुख करायला लावणारे विषय या युवा रंगकर्मीनी यशस्वीपणे हाताळले.

पाकिस्तानी अतिरेकी संघटनांच्या सततच्या हल्ल्याने त्रस्त झालेल्या भारतीयांना आपलीही अतिरेकी संघटना उभारण्याचा निर्णय घेतला. संघटनेचे नाव ब.ट.प.सं. अर्थात ‘बॉम्ब टाकून पळा संघटना’. भारतातील पहिली दहशतवादी संघटना अशी तिची रीतसर घोषणाही झाली. संघटनेचे काम सुरू झाले. सुरुवात बॉम्ब बनविण्यापासून झाली.  सगळे ब.ट.प.सचे सदस्य बॉम्ब बनवण्यासाठी अगदी मन लावून काम करत होते. काही दिवसांत त्यांचा बॉम्ब तयार होतो. मात्र बॉम्ब तयार झाल्यानंतर तो चोरीला जातो. सगळे जण बॉम्बची शोधाशोध सुरू करतात, पण बॉम्ब कुठेच मिळत नाही. शेवटी शोधून शोधून दमल्यावर ते सगळे एक जागी बसतात आणि तेवडय़ात तिथे त्यांना एक चिठ्ठी मिळते. ‘मी तुमचा बॉम्ब लपवला आहे’ असे त्या चिट्टीत लिहिलेले असते. चिठ्ठी नेमकी कोणी लिहिलीय हे कुणालाच माहिती नसतं. त्यामुळे सगळे जण आता त्या चिठ्ठी लिहिणाऱ्याचा पर्यायाने त्या बॉम्बचा शोध घेऊ लागतात. जसा जसा ते शोध घेतात, तसे कथानक पुढे जाते. त्यांना एकामागोमाग एक चिठ्ठय़ा मिळू लागतात. ‘तुम्ही वेळ घालवताय’, ‘मी तुम्हाला बॉम्ब टाकू देणार नाही’ असं त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेले असते. कुणी बॉम्ब लपवला आहे? का लपवला? कुठे लपवला आहे? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला ‘बॉम्ब चिकी चिकी बॉम्ब’ या विनोदी एकांकिकेत पाहायला मिळतात.

एकाच महाविद्यालयात असल्याने प्रफुल्ल गायकवाड, कल्पिता पावसकर आणि शिशिर कोंनूर या तिघांची मैत्री झाली. मुळात तिघांना अभिनयाची आवड होती. त्यामुळे  एकांकिकेच्या तालिमीच्या वेळी या तिघांची रोज भेट होत राहायची. महाविद्यालयात शिकत असताना त्यांच्या डोक्यात एक कल्पना आली की, आपण संगीत, नाटक आणि नृत्य यांना वेगवेगळं सादर न करता या तिघांचं एकत्रीकरण केलं तर जास्त चांगल्या प्रकारे लोकांसमोर सादर करू शकतो. मात्र महाविद्यालयीन अटी असल्यामुळे ते शक्य नव्हते. तेव्हा या तिघांनी मोरया थिएटर्स या नावाने एक संस्था सुरू केली. संस्था सुरू केल्यानंतर बरीच मुले या संस्थेत सहभागी झाली व संस्था अनेक खुल्या स्पर्धेमध्ये भाग घेऊ  लागली. काही पारितोषिके मिळवल्यानंतर मोरया थिएटर्सने संस्कृती.कॉम या नावाने १७ जून २०१५ रोजी ठाण्यातल्या गडकरी रंगायतनात सभागृहात आपला पहिला आगळावेगळा प्रयोग सादर केला.

गोंधळ, जागरण, कोळी, लावणी, जाखडी नृत्य (बाल्या डान्स), दिंडी, वारी अशा नृत्य प्रकारांचा त्यात सहभाग होता. त्यासोबत शास्त्रीय संगीत, लोकसंगीत आणि जुगलबंदी असे संगीत व त्यांच्या जोडीला माइम आणि स्कीट असे अभिनयाचे प्रकारही सादर करण्यात आले. आपल्या पहिल्याच प्रयोगाला बऱ्यापैकी यश मिळाल्यावर सगळेच जण खूप खूश होते. मुळात आपला हा प्रयोग लोकांना आवडतोय याचं त्यांना समाधान वाटत होतं. पुढे अजून मोठी झेप घेणं हे आता सगळ्यांचं ध्येय होतं, पण आपल्याला एकटय़ाने ते शक्य नाही म्हणून मोरया थिएटर्सने इंप्रोव्हिजेशन, मुंबई या संस्थेला सोबत घेऊन पुढचा प्रयोग करण्याचं ठरवलं. त्यानंतर हा संघ ४० हून अधिक जणांचा झाला. पुढे त्यांनी जोमाने आपल्या कामाला सुरूवात केली.

मोरया इव्हेंट्स अँड एंटरटेनमेंट आणि इंप्रोव्हिजेशन मुंबई यांनी मिळून हास्यविष्कार या नावाने नुकताच (२७ जून) गडकरी रंगायतन सभागृहात कार्यक्रम केला. या कार्यक्रमात विशाल कदम लिखित एक एकांकिका (बॉम्ब चिकी चिकी बॉम्ब) आणि एक दुर्गाक (हाऊसगुल) अशा दोन कलाकृती सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला. या दोन्ही प्रयोगांसाठी विनोद जाधव यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी पार पडली. प्रफुल्ल गायकवाड, तुषार जोशी आणि शिशिर कोंनूर यांनी नाटकाच्या संगीताची जबाबदारी पार पडली. कौस्तुभ तटकरे यांनी नाटकाला लागणारी प्रकाश योजना सांभाळली व योगेश साळगांवकर यांनी सगळे नैपथ्य उभे केले. कल्पिता पावसकर, रेणुका देशपांडे, मयूरेश खोले, आकाश कांबळे आणि निमेश शेट्टे यांनी सगळं बॅक स्टेज सांभाळण्याची जबाबदारी हाती घेतली. या दोन्ही कलाकृतींमध्ये दहशतवाद, घरांचे वाढते दर असे गंभीर विषय हास्यविनोदाच्या माध्यमातून मांडण्यात आले.

‘बॉम्ब चिकी चिकी बॉम्ब’ या एकांकिकेने मा.ना.चि.(मालिका, नाटक, चित्रपट) स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला व यासोबतच सर्वोत्तम लेखन, सर्वोत्तम दिग्दर्शन, सर्वोत्तम विनोदी कलाकार अशी अनेक पारितोषिके मिळवली. विनोद जाधव, संदीप रेडकर आणि ऐश्वर्या पाटील यांना त्यांच्या अभिनयासाठी पारितोषिके देण्यात आली. यासोबतच निर्माता करंडक दीर्घाक स्पर्धेत ‘हाऊसगुल’ या दीर्घाकाने दुसरा क्रमांक पटकावला व मयूर दळवी याला सर्वोत्तम विनोदी अभिनेत्याचे परितोषिक देण्यात आले. सप्टेंबर महिन्यात मोरया इव्हेंट्स अँड एंटरटेनमेंट ठाण्यातली पहिली खुली राज्यस्तरीय स्कीट स्पर्धा भरवण्याच्या मार्गावर आहे. यासोबतच हास्यविष्कार भाग २ हा डिसेंबरमध्ये आपल्याला आपल्या जवळच्या नाटय़गृहात पाहायला मिळेल. मोरया इव्हेंट्स अँड एंटरटेनमेंट या नावाने असलेल्या फेसबुक व युटय़ूब पेजवर आपल्याला संस्थेच्या पुढच्या प्रयोगांची माहिती मिळू शकते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2016 2:09 am

Web Title: black comedy in marathi drama
Next Stories
1 नामवंतांचे बुकशेल्फ : पुस्तकांनी जगणे शिकविले
2 कॉलेजच्या कट्टय़ावर : युथ फेस्टिवलच्या तयारीची लगबग
3 खेळ मैदान : घोडबंदर मॅरेथॉनमध्ये यश, संयुरी विजेते
Just Now!
X