करोनाच्या दुसऱ्या लाटेत आता नवीन संकट उभं राहताना दिसत आहे. करोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांना काही आजार होताना दिसत असून, यात म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराने काळजीत भर टाकली आहे. करोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांमध्ये साखरेची अनियंत्रित पातळी आणि स्टिरॉईडसह अन्य औषधांमुळे कमी झालेल्या रोगप्रतिकारकशक्तीमुळे म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराचे प्रमाण दुसऱ्या लाटेत वाढले आहे. राज्यातील विविध भागात या आजाराचे रुग्ण आढळून आले असून, ठाण्यातही एका रुग्णाला म्युकरमायकोसिस झाल्याचं निदान झालं आहे.

काही दिवसांपूर्वी एका ५६ वर्षीय महिलेला करोनाची लागण झाली. या महिलेवर ठाणे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच्या काळात तिच्या उजव्या डोळ्याची हालचाल होत नसल्याचं समोर आलं. या लक्षणाची गंभीर दखल घेत रुग्णालयाने त्या महिलेच्या काही चाचण्या केल्या. या चाचणी अहवालातून त्यांना म्यूकरमायकोसिस या आजाराची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. या आजाराचे रुग्ण यापूर्वी नागपूर, नाशिक, नंदूरबार, या जिल्ह्यातही आढळून आले आहेत.

जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु असताना रुग्ण महिलेचा उजवा डोळा लाल झाला. यावेळी कर्तव्यावरील डॉक्टरांनी नेत्र विभागाशी संपर्क करून रुग्णाची तपासणी करण्याचा सल्ला दिला. जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक डॉ. शुभांगी अंबाडेकर यांनी महिला रुग्णांची तपासणी केली. त्यानंतर त्यांचे सिटीस्कॅन, ओर्बिट ब्रेन सिटी स्कॅन करण्यात आले. त्यावेळी त्यांच्या उजव्या डोळ्याच्या मास पेशींना सूज असल्याचे दिसून आले. तर, सायनसमध्ये देखील सूज असल्याचे अहवालातून निष्पन्न झालं. सध्या महिलेवर उपचार सुरू आहेत.

लक्षणे

नाकातून काळसर द्रव बाहेर पडणे, नाक सतत वाहत राहणे, डोळ्यांमधून पाणी येणे, डोळ्यांना सूज येणे, डोळे लाल होणे, नजर कमी होणे, अकारण दात हलणे, दात दुखणे

औषधांचा खर्च सुमारे १५ ते २० लाख

करोनाच्या आधी हा आजार वर्षांतून तीन ते चार रुग्णांमध्ये आढळून येत होता. त्यामुळे औषधांची मागणीही तुलनेने कमी होती; परंतु आता रुग्णसंख्या मोठय़ा प्रमाणात वाढल्याने औषधांची मागणीही वाढली आहे. त्यामुळे पुढील काही आठवडय़ांत याचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे. मुळातच ही औषधे खूप महाग आहेत. रुग्णाला ही औषधे जवळपास तीन ते सहा आठवडय़ांपर्यंत घ्यावी लागतात. त्यामुळे एका रुग्णाला जवळपास १५ ते २० लाखांपर्यंतच खर्च येतो, अशी माहिती कान-नाक- घसातज्ज्ञ डॉ. अशेष भूमकर यांनी दिली.