करोनातून बरे झालेल्या रुग्णांना साखरेची अनियंत्रित पातळी आणि स्टिरॉईडसह अन्य औषधांमुळे कमी झालेल्या रोगप्रतिकारकशक्तीमुळे म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराचा संसर्ग होत असून, या नव्या संकटामुळे महाराष्ट्राच्या चिंतेत भर पडली आहे. ठाण्यात म्युकरमायकोसिसमुळे दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर सहा जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी याची माहिती दिली.

करोनाच्या दुसऱ्या लाटेत ब्लॅक फंगल अर्थात म्युकरमायकोसिसच्या आजाराने डोकं वर काढलं आहे. राज्यात अनेक ठिकाणी म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळून आले असून, ठाण्यात दोघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. म्हारळ भागातील एक ३८ वर्षीय रुग्ण तर डोंबिवलीतील एक अशा दोन रुग्णांचा म्युकरमायकोसिसमुळे मृत्यू झाला आहे. या दोन्ही रुग्णांवर कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वेगवेगळ्या कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू होते, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांनी ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.

म्युकरमायकोसिसचा आणखी रुग्णांना संसर्ग झाल्याचं निदान झालं असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सहा रुग्णांपैकी दोन रुग्णांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे, अशी माहितीही पाटील यांनी दिली. मधुमेहाची व्याधी असलेल्या रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिसचा संसर्ग आढळून येतो. त्यामुळे करोना रुग्णांनी घाबरून जाण्याचं कारण नाही, असं आवाहनही पाटील यांनी केलं आहे. करोना रुग्णांवर उपचार करताना स्टिरॉईडचा जास्त वापर न करण्याची गरज नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

म्युकरमायकोसिस म्हणजे काय?

‘म्युकरमायकोसिस’ हा बुरशीजन्य आजार आहे. या बुरशीचा हवेतून संसर्ग होते. रोगप्रतिकारकशक्ती चांगली असलेल्यांना यापासून धोका नाही; परंतु रोगप्रतिकारकशक्ती कमी झालेल्या रुग्णांना तीव्र धोका असतो. नाकावाटे ही बुरशी शरीरात प्रवेश करते. तेथून ती सायनसमध्ये वाढते. कर्करोगाच्या पेशींपेक्षाही जलद गतीने वाढणारी ही बुरशी डोळ्यांतील पेशी, मेंदूतही प्रवेशही करते. त्यामुळे इतर बुरशीजन्य आजारांपेक्षाही हा संसर्ग अधिक धोकादायक असून याची बाधा झालेल्यांमध्ये जवळपास ३० टक्के मृत्युदर आहे.

काय आहेत म्युकरमायकोसिसची लक्षणं?

१) नाकातून काळसर द्रव बाहेर पडणे.

२) नाक सतत वाहत राहणे.

३) डोळ्यांमधून पाणी येणे.

४) डोळ्यांना सूज येणे.

५) डोळे लाल होणे, नजर कमी होणे.

६) अकारण दात हलणे, दात दुखणे.