डोंबिवली एमआयडीसी परिसर सोमवारी एका कंपनीतील कॉम्प्रेसरच्या स्फोटाने पुन्हा एकदा हादरला. अॅल्यूफिन या कंपनीतील कॉम्प्रेसरच्या स्फोटात एक कामगार गंभीर जखमी झाला. कामगाराची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या स्फोटामुळे एमआयडीसी परिसरातील कंपन्यांमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

एमआयडीसी फेज- २ येथील प्लॉट नंबर १५३ येथे अॅल्यूफिन ही कंपनी असून या कंपनीत अॅल्युमिनियम कोटींगचे काम केले जाते. कंपनीत सकाळच्या शिफ्टमध्ये चार कामगार काम करत होते. या दरम्यान राजू जावळे (५९) हे व्हॉल्व बंद करण्यासाठी जात असताना कॉम्प्रेसरचा स्फोट झाला. या स्फोटात राजू जावळे गंभीर जखमी झाले असून त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. राजू जावळे यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे मानपाडा पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, अॅल्यूफिन ही कंपनी १९७८ साली सुरु झाली होती. कंपनीचे मालक कोण याविषयी अद्याप अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. कॉम्प्रेसरमध्ये स्फोट कशामुळे झाला हे अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेचा पोलीस अधिक तपास करत असून तपासात दोषी आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले. स्फोटाच्या आवाजाने एमआयडीसी परिसर हादरुन गेला. रहिवाशांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्फोट इतका भीषण होता की कॉम्प्रेसरचा काही भाग थेट रस्त्यावर येऊन पडला. बॉयलरचा स्फोट झाल्याची अफवा पसरली होती. मात्र काही वेळाने कॉम्प्रेसरचा स्फोट झाल्याचे स्पष्ट झाले.

गेल्या वर्षी एमआयडीसीतील प्रोबेस या कंपनीत भीषण स्फोट झाला होता. या स्फोटात १० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. तर अनेकजण या स्फोटात जखमी झाले होते. स्फोटात प्रोबेस एन्टरप्रायझेस ही कंपनी जमीनदोस्त झाली होती. सोमवारी सकाळच्या घटनेनंतर या स्फोटाच्या कटू आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या.