पेपर लिहायला ‘लिपिक’ तयार करण्यासाठी तरुणांची मोहीम
परीक्षेला पेपर लिहिण्यासाठी लिपिक नाही, या कारणाने एका दृष्टिहीन मुलास परीक्षेस बसण्यास नाकारल्याचा अनुभव ऐकल्यावर सामाजिक भान असलेल्या अपूर्वा आपटेच्या मनात विद्यार्थ्यांच्या परीक्षा काळातील अडचणींची जाणीव झाली याच जाणिवेतून अपूर्वाने व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून दृष्टिहीन विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी लिपिक तरुण, प्राध्यापकांचा समूह तयार करत सामाजिक जाणिवेचा आदर्श तरुणांसमोर ठेवला आहे.
अंध विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दिवसात अनेकदा लिपिक उपलब्ध होत नाहीत. लवकरच महाविद्यालयांमध्ये परीक्षांचा काळ सुरू होईल आणि या काळात अनेक महाविद्यालयांमध्ये असणाऱ्या अंध विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळी लिपिक उपलब्ध होत नाही. लिपिकाच्या शोधात या विद्यार्थ्यांचे ऐन परीक्षेच्या काळात अभ्यासाकडे दुर्लक्ष होते. विद्यार्थ्यांची ही समस्या लक्षात घेता तरुण मित्रांनी एकत्र येऊन काहीतरी करावे या उद्देशाने जोशी- बेडेकर महाविद्यालयातील संज्ञापन व पत्रकारिता वर्गात शिकणाऱ्या अपूर्वा आपटेला व्हॉट्सअ‍ॅपवर लिपिकांचा समूह तयार करण्याची कल्पना सुचली. तिने ही कल्पना ऋषिकेश मुळे या आपल्या मित्राला सांगितल्यावर दोघांच्या समन्वयाने ‘कर्तव्य’ नावाचा व्हॉट्सअ‍ॅप समूह तयार करण्यात आला आहे. तरुण मित्रांच्या सहकार्याने ब्रेल लिपीचे जनक लुईस ब्रेल यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून या दिवशी या अभिनव सामाजिक कार्यास सुरुवात झाली.
‘कर्तव्य’ या व्हॉट्सअ‍ॅप समूहात जोशी बेडकर महाविद्यालय, रुईया महाविद्यालय आणि ज्ञानसाधना महाविद्यालयातील अंध विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तसेच व्हॉट्सअ‍ॅपचा वापर न करणाऱ्या अंध विद्यार्थ्यांच्या पालकांना या समूहात सहभागी करून घेण्यात आले आहे. अंध विद्यार्थ्यांना लिपिक म्हणून सहकार्य करण्यास इच्छुक असणारे विद्यार्थी, प्राध्यापक, सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींचा त्यात आहे. अंध विद्यार्थ्यांला ज्या दिवशी परीक्षेसाठी लिपिकाची गरज भासेल, तेव्हा तो इतरत्र शोधाशोध न करता त्या समूहावर त्याचे नाव, कॉलेज पत्ता, परीक्षेचा कालावधी व विषय भाषा या व इतर महत्त्वाच्या नोंदी टाकेल. त्या वेळी जो उपलब्ध असेल तो लिपिक म्हणून येऊ शकेल, अशी या समूहाची कल्पना आहे. जी व्यक्ती लिपिक म्हणून सहकार्य करते, त्या व्यक्तीचे कौतुक करण्यासाठी त्या दिवशी कर्तव्य समूहाच्या नावासोबत या व्हॉट्सअ‍ॅप समूहाला त्या संबंधित व्यक्तीचे नाव देण्यात येते. या समूहात सहभागी होण्यासाठी ९७६९८७८५०३ या क्रमांकाशी संपर्क साधावा असे अपूर्वा आपटे हिने सांगितले.