गड-किल्ल्यांची सफर म्हणजे आनंदाची पर्वणीच असते. प्रत्येक ऋतूमध्ये किल्ल्याचे सौंदर्य वेगवेगळे असते. मात्र नेत्रहिनांना त्याचा लाभ घेता येत नाही. अंध व्यक्तींची ही खंत लक्षात घेऊन डोंबिवलीतील चंद्रकांत साटम गेली पाच वर्षे अंध मुला-मुलींना गड-किल्ल्यांची सफर घडवून आणत आहेत. मुंबई महापालिकेत नोकरी करणाऱ्या चंद्रकांत साटम यांना ट्रेकिंगची आवड आहे. यंदा १५ आणि १६ ऑगस्ट रोजी नॅब संस्थेतील अंध विद्यार्थ्यांना घेऊन ते पुरंदर किल्ल्यावर जाणार आहेत.
लांबून सोपा वाटणारा एखादा गड किंवा किल्ला प्रत्यक्ष चढताना थरार अनुभव देतो. एकदा तो सर केला की, त्याचा आनंद औरच असतो. या किल्ल्यांचे विहंगम दृश्य कायमचे मनावर कोरले जाते. प्रत्येकाने कधी ना कधी असे रांगडे पर्यटन करायलाच हवे. पर्यटनाचा हा आगळावेगळा अनुभव दृष्टिहीन मुलांनाही घेता यावा यासाठी गेली पाच वर्षे चंद्रकांत साटम व त्यांचे सहकारी प्रयत्न करत आहेत. साटम हे मुंबई महापालिकेत नोकरी करतात. त्यांना ट्रेकिंगची आवड आहे. अशातच एक दिवस नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या वरळीच्या संस्थेच्या शिक्षकांचा त्यांना फोन आला आणि आमच्या मुलांसाठी अशा पद्धतीचे ट्रेकिंगचे आयोजन करता येईल का, अशी विचारणा केली. साटम यांनी ते आव्हान स्वीकारले. या संस्थेत मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी आदी सर्व परिसरांतील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात. त्यांना निसर्गसौंदर्याचीही जाणीव व्हावी यासाठी आम्ही या मुलांना गड-किल्ल्यांची सैर करण्याचे ठरविले. त्यानुसार आत्तापर्यंत सिंहगड, लोहगड, रायगड, प्रतापगड व भाज्याची लेणी या मुलांनी पाहिली आहेत. नेत्रहीन असले तरी या मुलांची स्मरणशक्ती आणि स्पर्शज्ञान एवढे जबरदस्त असते की, न पाहाताही ते कोणत्याही वस्तूचा अंदाज बांधतात, अशी माहिती साटम यांनी दिली.