स्फोटके सापडल्याने स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त; राज्य राखीव दलाच्या तुकडय़ा तैनात, वाहनांची तपासणी

नालासोपाऱ्यात सापडलेले बॉम्ब, आक्रमक झालेल्या हिंदुत्ववादी संघटना आणि स्वातंत्र्यदिन या पार्श्वभूमीवर बुधवारी नालासोपारा शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नालासोपारा शहरात जाणाऱ्या सहाही मार्गावर नाकेबंदी करण्यात आली असून स्थानिक पोलिसांबरोबर राज्य राखीव दलाच्या तुकडय़ा तैनात करण्यात आल्या आहे. दरम्यान पोलिसांनी हिंदू आणि मुस्लीम समाजाच्या बैठका घेऊन शांतता बाळगण्याचे आवाहन केले आहे.

गेल्या आठवडय़ात नालासोपाऱ्याच्या भंडार आळीतून हिंदुत्ववादी संघटनेचा कार्यकर्ता वैभव राऊत याच्या घरातून दहशतवादविरोधी पथकाने स्फोटके आणि शस्त्रास्त्रे जफत केली. यानंतर राज्यभरातून हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांचे अटकसत्र सुरू झाले आहे. नालासोपाऱ्यातील स्थानिक ग्रामस्थ आणि हिंदुत्ववादी संघटना वैभव राऊतच्या समर्थनार्थ पुढे आल्या असून त्यांनी शुक्रवारी मोर्चा आयोजित केला आहे. त्यासाठी जय्यत तयारी सुरू झाली आहे. त्यातच बुधवारी स्वातंत्र्यदिनाचा सोहळा होणार आहे. स्वातंत्र्यदिनी घातपात आणि अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी शहरात चोख बंदोबस्त ठेवला आहे.

‘समाजमाध्यमां’वरही पोलिसांचे लक्ष

सध्या शहरातील वातावरण तणावाचे बनलेले आहे. त्यामुळे साध्या वेशातील पोलीसही जागोजागी तैनात करण्यात आलेले आहेत. मोर्चाच्या निमित्ताने होणाऱ्या सभांवरही पोलिसांना लक्ष ठेवावे लागणार आहे. समाजमाध्यमांवर या संदर्भात पसरवले जाणारे संदेश, प्रक्षोभक वक्तव्य पोलिसांकडून तपासले जाणार आहे. बाहेरून येणाऱ्या लोकांवरही लक्ष ठेवले जाणार आहे. रेल्वे पोलिसांनीही सर्व लोकल ट्रेन, रेल्वे स्थानक परिसराची कसून तपासणी सुरू केली आहे. शहरातील लॉज, हॉटेलमध्ये थांबलेल्या लोकांची तपासणी करण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व पोलीस यंत्रणेला सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हिंदू आणि मुस्लीम समाजांच्या बैठका घेऊन त्यांना शांतता बाळगण्याचे आवाहन केले आहे. नालासोपारात शहरात दिवसभर पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे.

– दत्ता तोटेवाड, पोलीस उपअधीक्षक, नालासोपारा

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर शहरात उद्भवलेली तणावाची स्थिती लक्षात घेऊन आम्ही शहरात अतिरिक्त बंदोबस्त ठेवला आहे. आम्ही या वेळी पोलीस गस्तीवर जास्त भर दिला आहे.

– विजय सागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक

चोख बंदोबस्त

  • स्थानिक पोलिसांसह शहरात राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकडय़ा तैनात केल्या आहेत.
  • नालासोपारा शहरात येण्याचे सहा मार्ग आहेत. या सहाही मार्गावर नाकाबंदी केली आहे.
  • वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.
  • संशयास्पद व्यक्तीची तपासणी केली जात आहे.