मीरा-भाईंदरमध्ये दररोज २५ ते ३० रुग्णांचे जीव वाचवण्यात यश

भाईंदर: मीरा-भाईंदर शहरात रक्तद्रव संकलनात मोठी वाढ झाली आहे. विशेष बाब म्हणजे रक्तद्रव दान करणाऱ्यांची संख्या वाढली असल्याने दररोज सुमारे २५ ते ३० करोनाबाधित रुग्णांचे जीव वाचवण्यास मदत होत आहे. त्यामुळे अधिकाधिक करोनामुक्त रुग्णांनी रक्तद्रव संकलन करण्यास पुढे यावे असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

मीरा-भाईंदर शहरात गेल्या दीड महिन्यापासून करोना आजाराने कहर केला आहे. दररोज ३०० ते ४०० च्या संख्येने वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य व्यवस्थेवर मोठय़ा प्रमाणात ताण पडला आहे. अशा परिस्थितीत शहरातील शासकीय रुग्णालय आणि खासगी रुग्णालये पूर्ण भरलेली असून उपचाराकरिता आवश्यक असलेल्या औषधांचा गंभीर प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे करोनाविरुद्ध उपयुक्त ठरत असलेल्या रक्तद्रव पद्धतीला मोठय़ा प्रमाणात प्राधान्य देण्यात येत आहे. मात्र, करोनामुक्त रुग्ण रक्तद्रव देण्यास पुढे येत नसल्याने दुहेरी संकट निर्माण झाले होते.

मीरा-भाईंदर महानगरपालिका प्रशासनाकडून रक्तद्रव संकलन गोळा करण्याकरिता इंदिरा गांधी रुग्णालय येथे रक्तपेढीची निर्मिती करण्यात आली आहे. या रक्तद्रव पेढीत काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांकडून करोनामुक्त रुग्णांचे समुपदेशन करण्यात येत आहे. तसेच या कामात त्यांना विविध पक्षांतील युवकांची मोठय़ा प्रमाणात मदत प्राप्त होत आहे. त्यामुळे पूर्वी दिवसाला केवळ १ किंवा २ रक्तद्रव जमा होत असताना आता त्यात ३०ने वाढ झाली आहे. त्यामुळे दररोज २५ ते ३० रुग्णांना रक्तद्रव प्राप्त करणे सोयीचे होत आहे. तसेच, यात अधिक वाढ होणे आवश्यक असल्याने मोठय़ा प्रमाणात करोनमुक्त रुग्णांनी रक्तद्रव दान करावे असे आवाहन राजीव गांधी रक्तपेढी प्रमुख विनायक चौधरी यांनी केले आहे.

पोलीस रक्तद्रव दान करण्यास सरसावले

मीरा-भाईंदर शहरात वाढत्या रक्तद्रव संकलनाच्या मागणीला पूर्ण करण्याकरिता पोलीस कर्मचारी आणि अधिकारी पुढे सरसावले असल्याची बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे समाजमाध्यमांवर रक्तद्रव संकलनाची माहिती मिळताच करोनामुक्त पोलीस अधिकारी आपल्या रक्त गटाची माहिती आणि दूरध्वनी क्रमांक नागरिकांना देत आहेत. यामुळे अनेक नागरिकांना रक्तद्रव मिळणे सोयीस्कर झाले आहे. त्याच प्रकारे आम्ही महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असून जनतेला आमची जेव्हा जेव्हा गरज असेल तेव्हा आम्ही त्यांच्यासाठी रक्त देण्यास सैदव तयार आहोत अशी प्रतिक्रिया काशिमीरा गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी दिली.