पालिकेची जोरदार मोहीम, कारवाई रोखण्यासाठी आयुक्तांना दूरध्वनी

ठाणे तसेच कळवा, मुंब्रा शहरांतील पदपथांवर झालेली अतिक्रमणे हटवण्याची कारवाई महापालिकेने सोमवारपासून हाती घेतल्याने शहरातील फेरीवाले तसेच अनधिकृत स्टॉलधारकांचे धाबे दणाणले आहेत. सोमवारी सकाळी यासंबंधीची कारवाई सुरू होताच अनेक प्रभागांमधून कारवाई थांबवा, असे दूरध्वनी आपणास आल्याची माहिती आयुक्त जयस्वाल यांनी दिली. यामध्ये काही राजकीय नेत्यांचा सूर आर्जवापेक्षा दमदाटीकडे झुकणारा होता, असेही ते म्हणाले. ‘तुम्हाला कुणी धमकी दिली का’, या प्रश्नावर मात्र जयस्वाल यांनी मला धमकी देण्याची हिंमत कुणी करेल, असे वाटत नाही, असेही सांगितले.

ठाणे स्थानक परिसराजवळील गोखले रोड, राममारुती रोड, पाचपाखाडी, जांभळीनाका, मुख्य बाजारपेठ आदी भागात फेरीवाल्यांनी पदपथ आणि रस्ते अडविल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. काही भागात पदपथांवर पक्की बांधकामे तसेच टपऱ्या उभ्या राहिल्या आहेत. शहरातील पदपथ, मुख्य चौक आणि रस्ते फेरीवाल्यांनी गिळंकृत केल्याने नागरिकांना चालणे कठीण झाले आहे.

या पाश्र्वभूमीवर पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी गेल्या आठवडय़ात बैठक घेऊन अतिक्रमणांविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सोमवारी सकाळपासूनच सर्वच प्रभाग समितीमधील अतिक्रमण पथकामार्फत पदपथांवरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू करण्यात आली. अतिक्रमण पथकातील अधिकारी, कर्मचारी आणि फेरीवाल्यांचे साहित्य जप्त करण्यासाठी मोठी वाहने, असा फौजफाटा प्रभाग समित्यांच्या हद्दीत सकाळपासूनच फिरत होता. तसेच या पथकामार्फत पदपथावरील अतिक्रमणे काढण्याचे काम सुरू होते. या कारवाईमुळे फेरीवाल्यांचे धाबे दणाणले होते. या कारवाईसंबंधी वेळ मर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही. पुढील पावसाळ्यापर्यंत ही कारवाई सातत्याने सुरू राहील, अशी माहिती जयस्वाल यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली.