येत्या दोन महिन्यांत रस्ता वाहतुकीस खुला करणार
घोडबंदर मार्गावरील प्रवास कोंडीमुक्त व्हावा यासाठी अतिक्रमणांविरोधात जोरदार मोहीम हाती घेतल्यानंतर ठाणे महापालिकेने आता सेवा रस्त्यांचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी खासगी कंपन्यांच्या जागा संपादित करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. वाघबीळ नाका येथे दलाल तसेच माजिवडा येथील गुडविल कंपनीची जागा या रस्त्यासाठी पुढील टप्प्यात संपादित केली जाणार आहे. यासाठी या कंपन्यांना विकास हस्तांतरण हक्क (टीडीआर) प्रदान करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण होताच सेवा रस्त्यांची कामे वेगाने सुरू होतील, असा विश्वास महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ‘लोकसत्ता ठाणे’शी बोलताना व्यक्त केला. येत्या दोन महिन्यांत हा सेवा रस्ता खुला करण्याचे लक्ष्य महापालिकेने आखले असून असे झाल्यास घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी मोठय़ा प्रमाणावर कमी होऊ शकेल.
ठाणे-मुंबई-अहमदाबाद मार्गावरील प्रवासासाठी घोडबंदर मार्ग अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. गेल्या काही वर्षांत या
मार्गावर मोठय़ा प्रमाणावर गृहसंकुले उभी राहिली आहेत. घोडबंदर, गायमुख मार्गावरून मीरा-भाईंदरमार्गे पश्चिम उपनगरांच्या दिशेने ये-जा करणाऱ्या नागरिकांची संख्या बरीच मोठी आहे. त्यामुळे या मार्गावर मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. त्यामुळे महापालिकेने या मार्गालगत सेवा रस्त्यांच्या उभारणीचे काम हाती घेतले असून या कामाच्या आड येणाऱ्या अतिक्रमणांविरोधात जोरदार मोहीम हाती घेण्यात आली आहे. या रस्त्यावरील उर्वरित अडथळे त्वरित दूर करून सव्र्हिस रोडचे काम हाती घेण्याचे आदेश आयुक्त संजीव जयस्वाल यांनी नगर अभियंता रतन अवसरमोल यांना दिले आहेत.
या संदर्भात महापालिका मुख्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण, स्टेमचे व्यवस्थापकीय संचालक कर्नल चौधरी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये वाघबीळ नाका येथील दलाल व माजिवडा येथील गुडविल कंपनीची जागा सेवा रस्त्यांसाठी संपादित करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच ओम-शक्ती सोसायटी, बॉम्बे फायबर कंपनीची जागा संपादित करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेशही या वेळी देण्यात आले. सव्र्हिस रोड आणि कल्व्हर्टच्या कामातील बाधित स्टेम प्राधिकरणाच्या जलवाहिन्या स्थलांतरित करणे, तसेच पातलीपाडा येथील स्टेमच्या वॉटर टँकजवळील प्राधिकरणाची बाधित संरक्षक भिंत हटविणे याबाबत येत्या सात दिवसांत कार्यवाही पूर्ण करावी, अशा सूचनाही या वेळी देण्यात आल्या.

पुनर्वसनाच्या हालचाली
सेवा रस्त्यांच्या कामात बाधित झालेल्या रहिवाशांचे पुनर्वसन करण्याच्या सूचना देतानाच मोहन मिल कंपाऊंड, आनंदनगर नाका, भाईंदरपाडा व पातलीपाडा येथील महावितरणचे ट्रान्सफॉर्मर स्थलांतीित करण्यासाठी पर्यायी जागा देणे, कासार वडवली पोलीस ठाणे स्थलांतरित करणे आदीबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेशही जयस्वाल यांनी दिले. कासार वडवली पोलीस ठाण्यासाठी कॉसमॉस ज्वेलर्स या प्रकल्पाच्या आराखडय़ातील सुविधा भूखंड निश्चित करण्यात आला आहे. पोलीस ठाण्याचे कायमस्वरूपी बांधकाम पूर्ण होईपर्यंत तेथेच तात्पुरत्या स्वरूपाचे बांधकाम करून पोलीस ठाणे स्थलांतरित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.