ठाणे शहरातील विकास आराखडय़ात शाळा, उद्याने, मैदाने, रुग्णालये अशा विविध सार्वजनिक सुविधांसाठी आरक्षित ठेवण्यात आलेल्या भूखंडांवर होत असलेले अतिक्रमण रोखण्यासाठी ठाणे महापालिकेने आता नामी शक्कल काढली आहे. आतापर्यंत अतिक्रमणापासून बचावलेल्या आरक्षित भूखंडांवर वाहनतळांसाठी जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने केला आहे. पालिकेच्या शहर विकास विभागाच्या प्रस्तावानुसार, या पद्धतीने शहरातील वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न मिटणार आहेच; शिवाय पालिकेचे आरक्षित मोकळे भूखंडही सुरक्षित राहणार आहेत. ठाणे शहरात वाहनांच्या पार्किंगचा मुद्दा दिवसेंदिवस महत्त्वाचा ठरू लागला आहे. शहरात वाहनतळांसाठी पुरेशी जागा नसल्याने रस्त्यांच्या कडेला वाहने उभी करण्यात येतात. यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. महापालिकेने विकास आराखडय़ात वाहनतळांसाठी आरक्षित केलेल्या २७ भूखंडांवर गेल्या काही वर्षांत चाळी तसेच झोपडपट्टय़ा उभ्या राहिल्या आहेत. काही भूखंडांवर तर भूमाफियांनी इमारतीच उभ्या केल्या आहेत. या पाश्र्वभूमीवर महापालिकेने अन्य कारणांसाठी आरक्षित ठेवण्यात आलेले भूखंड वाहनतळांसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. विविध सार्वजनिक सुविधा उभारणीसाठी आरक्षित करण्यात आलेल्या, परंतु अद्याप वापरात नसलेले मोकळे भूखंड पार्किंगसाठी देण्याचा प्रस्ताव शहर विकास विभागाने तयार केला आहे.ठाणे शहरात रस्त्याच्या कडेला बेकायदा पद्धतीने वाहने उभी करणाऱ्यांविरोधात वाहतूक पोलिसांनी जोरदार कारवाई सुरू केली असून अशी वाहने उचलून तीनहात नाका येथील सेवा रस्त्यांवर नेऊन उभी केली जातात. कारवाई केलेल्या वाहनांसाठी जागा उपलब्ध करून दिली जावी, अशी मागणी शहर वाहतूक पोलिसांनी पालिकेकडे केली आहे. हा प्रस्ताव शहर विकास विभागाने मान्य केला असून इतर सुविधांसाठी आरक्षित असलेल्या भूखंडांवर अशा प्रकारची तात्पुरती सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पार्किंगचा पेच सुटणार?

महापालिका प्रशासनाने गेल्या काही महिन्यांपासून शहरात वाहनतळांची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी वेगवेगळ्या स्वरूपाच्या योजनांची आखणी सुरू केली आहे.

मध्य रेल्वे प्रशासनाने रेल्वे स्थानक परिसरात सुमारे २५०० वाहन क्षमतेचे दुमजली वाहनतळ उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

ठाणे महापालिकेने लगतच असलेल्या गावदेवी मैदानात ३०० वाहन क्षमतेचे भूमिगत वाहनतळ उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सुमारे २७ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

यामुळे शहरातील वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न सुटण्याची चिन्हे आहेत.