पोलीस म्हणतात, बोट निघण्यापूर्वीच उलटली; हलगर्जीपणा हा गुन्हा नाही

पाणजू बोट दुर्घटनेला दोन दिवस उलटून गेले तरी अद्याप कुणावरही पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही. तीे बोट निघण्यापूर्वीच उलटली होती, त्यामुळे लगेच गुन्हा दाखल करता येत नसल्याचा अजब पावित्रा पोलिसांनी घेतला आहे.

पाणजू बेटावर लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणारी बोट नायगाव खाडीकिनारी रविवारी सकाळी उलटली होती. या दुर्घटनेत एक जण ठार झाला, तर २१ जण जखमी झाले होते. फेरीबोटीऐवजी रेती वाहून नेणाऱ्या बोटीतून वऱ्हाडी मंडळींना नेण्यात येत होते. पण क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसल्याने बोट किनाऱ्यावरच उलटली आणि हा अपघात झाला. वसई पोलीस ठाण्यात या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली, परंतु मंगळवार उलटला तरी अद्याप बोटमालक किंवा या लोकांना बोटीत बसविणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

‘‘बोट पाण्यात निघालेली नव्हती. ती किनाऱ्यावरच होती. त्यामुळे हलगर्जीपणाचा गुन्हा लगेच दाखल करता येत नाही,’’ असे अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सांगितले. आमच्याकडे अद्याप कुणाची तक्रार आली नसल्याचेही त्यांनी सांगितले. पोलिसांना जर फिर्यादी व्हायचे असेल, तर अधिक तपास करून पुरावे गोळा करावे लागतील, असेही ते म्हणाले. उपविभागीय पोलीस अधीक्षक नरसिंह भोसले यांच्याकडे या प्रकरणाचा तपास असून त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिलीे नाही.

‘हत्येचा गुन्हा दाखल करा’

गावात येण्यासाठी प्रवासी फेरी बोट वापरलीे जाते. त्याची क्षमता तीस प्रवाशांची असते पण तरीही जास्त प्रवासी भरले जातात. पंचायत समितीमार्फत हा ठेका दिला जातो. त्यांचे यावर लक्ष असणे गरजेचे आहे, असे ग्रामस्थांनी सांगितले. संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

पालकमंत्र्यांची भेट

या दुर्घटनेनंतर पालकमंत्री विष्णू सावरा यांनी रुग्णालयात जाऊन जखमींच्या प्रकृतीची चौकशी करून शासनातर्फे सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. दुर्घटनेतील मृत रामचंद्र म्हात्रे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

गावात लग्नकार्य असले की रेती बोट मागवली जाते. दोन हजार रुपये शुल्क त्यासाठी आकारले जाते. परंतु माणसे बोटीत चढविताना यजमानाने किनाऱ्यावर आपली दोन माणसे ठेवून पुरेशी काळजी घ्यायला हवी. माझ्या घरच्या लग्नाच्या वेळीही मी अशीच रेती बोट वापरली होती. पण दोन्ही बाजूच्या किनाऱ्यावर घरातली माणसे ठेवून जास्त माणसे चढणार नाहीत याचीे खबरदारी घेत होतो.

– विलास भोईर, उपसरपंच, पाणजू