वनविभागातर्फे लवकरच पर्यटकांना सुविधा

ठाण्याच्या खाडी परिसरातील जैवविविधतेचा अनुभव घेण्यासाठी पर्यटकांकडून स्थानिक मच्छीमारांना पैसे देऊन बोटसफारी करण्याचे प्रकार वाढत असताना आता वनविभागानेच अशा प्रकारची बोट सफारी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. खाडीकिनारी पर्यटकांचा ओढा वाढत असल्याचे पाहून पर्यटकांची सुरक्षितता आणि माफक दरात पर्यटन सुविधा पुरवण्यासाठी शासनातर्फे खाडीमध्ये बोट सफारी सुरू करण्यात येणार आहे.

खाडी किनारच्या जैवविविधतेचे निरीक्षण करण्यासाठी, छायाचित्र काढण्यासाठी पर्यटक खाडीकिनारी गर्दी करतात. मात्र खाडी किनारच्या जैवविविधतेविषयी काही पर्यटकांना माहिती नसल्याने या ठिकाणी पर्यटनाचा व्यवसाय करणारे खासगी व्यावसायिक खाडी सफरीच्या माध्यमातून नफा कमावत असतात. पर्यटन व्यवसायाच्या निमित्ताने खासगी व्यावसायिकांना पर्यटकांकडून पुरेसा मोबदला मिळत असला तरी पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही खबरदारी घेतली जात नाही. मात्र शासनातर्फे सुरू करण्यात येणाऱ्या अधिकृत बोट राइडच्या माध्यमातून पर्यटक अधिकृत खाडी प्रवास करू  शकणार आहेत. शासनाच्या या उपक्रमाच्या माध्यमातून पर्यटकांना पक्ष्यांचे दर्शन घडवण्यासाठी वनविभागातर्फे कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. पर्यटकांकडून माफक शुल्क आकारण्यात येणार असून ठाणे खाडी येथून शासनमान्य अधिकृत बोट राइडला सुरुवात होणार आहे. दिवा जेटी या ठिकाणाहून ठाणे खाडी परिसरातील जैवविविधता पाहण्यासाठी बोट राइड सुरू होणार आहे. ठाणे खाडीतील सफारीसाठी वीस सीट्सची बोट खरेदी करण्यात आली आहे, अशी माहिती कांदळवन विभागाचे कार्यक्रम अधिकारी भास्कर पॉल यांनी दिली.

पूर्वनोंदणी आवश्यक

’ नोव्हेंबर ते एप्रिल या काळातील बोट राइडसाठी वनविभागाकडे पूर्वनोंदणी आवश्यक.

’ बोटराइडसाठी शासनातर्फे अधिकृत संकेतस्थळ  तयार करण्यात येणार आहे. या संकेतस्थळावर पर्यटकांनी आठ दिवस आधी नोंदणी करणे आवश्यक आहे.

’ हवामानाचा अंदाज घेऊन कोणत्या महिन्यात कोणत्या वेळी खाडीसफारी योग्य आहे, याचे वेळापत्रक या संकेतस्थळावर देण्यात येईल.

पाण्याची पातळी पाहून त्यानुसार दिवसातून एक वेळ बोटीने खाडीसफारी.

’ या बोट राइड उपक्रमासाठी ‘पार्टीसिपेटरी ईको टूरिझम प्लॅन रुल्स अ‍ॅण्ड रेग्युलेशन’ या योजनेच्या अंतर्गत स्थानिक कोळ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.