बदलापुरात मृतदेह अंत्यसंस्काराच्या रांगेत

सागर नरेकर, लोकसत्ता

बदलापूर : गेल्या काही दिवसांपासून करोना ससंर्गामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढल्याचा थेट परिणाम शहरातल्या स्मशानभूमीत दिसू लागला आहे. बदलापूर शहरात पश्चिमेला मांजर्ली स्मशानभूमीत दररोज सरासरी १५ ते २४ मृतदेह अंत्यसंस्कारांसाठी आणले जात आहेत. अनेकदा मृतांच्या नातेवाईकांना मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठी एक ते दोन तासांची प्रतीक्षा करावी लागते आहे. मृतदेहांची संख्या इतकी वाढली आहे की स्मशानभूमीत २४ तास एक न एक चिता धुमसत असल्याचे पाहायला मिळत आहे. इतकी दाहकता आजवर कधीही अनुभवली नव्हती, असे येथील कर्मचारी सांगतात.

१ एप्रिल ते २४ एप्रिल या काळात बदलापूर शहरातल्या मांजर्ली येथील स्मशानभूमीत तब्बल ३४६ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दररोज सरासरी १५ ते २४ मृतदेहांवर येथे अंत्यसंस्कार केले जातात. शहराच्या मध्यभागी, बाजारपेठ आणि रेल्वे स्थानक अशा वर्दळीच्या ठिकाणांहून अवघ्या काही मीटरवर असलेल्या या स्मशानभूमीत जवळपास २४ तास अंत्यसंस्कार केले जात असल्याचे जवळ राहणारे नागरिक सांगतात. अनेकदा येथे मृतांच्या नातेवाईकांची गर्दी पाहायला मिळते. येथे एका वेळी चार मृतदेहांना अग्नी देण्यासाठी व्यवस्था आहे. मात्र गेल्या काही दिवसात येथे मृतदेहांची संख्या वाढल्याने अनेकदा मृतांच्या नातेवाईकांना एक ते दोन तास प्रतीक्षा करावी लागते.

रविवारीही अशीच काहीशी परिस्थिती या स्मशानभूमीत पाहायला मिळाली. सायंकाळी सात नंतर एकाच वेळी आठ मृतदेह स्मशानभूमीत दाखल झाले होते. त्यामुळे स्मशानातील व्यवस्था अपुरी पडू लागली होती. त्यामुळे येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आणखी चार सरण रचले. त्यामुळे स्मशानभूमीत पहिल्यांदाच एकाच वेळी आठ मृतदेहांना अग्नी देण्यात आला. हे चित्र भयावह असल्याची प्रतिक्रिया येथे काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.

यापूर्वी कधीही आठ मृतदेहांना एका वेळी अग्नी देताना पाहिले नव्हते, असे त्यांनी सांगितले. गेल्या काही दिवसात स्मशानात येणाऱ्या मृतांची संख्या मोठी असून त्यामुळे अनेकदा चोवीस तासातील एकही वेळ अशी नसते की ज्यावेळी येथे सरणावरचा अग्नी विझलेला असतो, असेही येथील एका कर्मचाऱ्याने सांगितले आहे.