ठाणे सरकारी रुग्णालयात एक बेवारस मृतदेह सडला आहे. मागील पाच दिवसात एसी अर्थात वातानूकुलित यंत्रणा बंद झाल्याने हा मृतदेह सडला आहे. त्यातून अळ्याही बाहेर येत आहेत. बर्फ टाकून तात्पुरती उपाययोजना करण्यात आली आहे. मात्र तरीही ठाणे रूग्णालयात दुर्गंधी पसरली आहे. अति दुर्गंधीमुळे कर्मचाऱ्यांना आणि इतर मृतदेह नेण्यासाठी येणाऱ्या लोकांना याचा त्रास होतो आहे. याबाबत रूग्णालय प्रशासनाकडे तक्रारीही नोंदवण्यात आल्या आहेत. मात्र एसी बंद असल्याचं कारण पुढे करत रूग्णालयाने कोणतीही उपाययोजना केलेली नाही. त्यामुळे प्रचंड दुर्गंधीचा सामना लोकांना आणि कर्मचाऱ्यांना करावा लागतो आहे.

ठाणे सरकारी रूग्णालयात याआधीही असे अनागोंदीचे प्रकार घडले आहेत. त्याकडे सातत्याने दुर्लक्ष झाले आहे. अशात आता ही आणखी एक घटना समोर आली आहे. गेल्या पाच दिवसांपासून हा मृतदेह सडला आहे. तरीही त्याकडे लक्ष देण्याची तसदीही रूग्णालयाने घेतलेली नाही.