खुनाचा प्रकार?

अर्धवट जळलेल्या अवस्थेतील अनोळखी महिलेचा मृतदेह काशीमीरा भागातील घोडबंदर येथील जंगलात आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. खुनाचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

घोडबंदर येथील जंगलात एका महिलेचा अर्धवट जळलेल्या अवस्थेतील मृतदेह असल्याची माहिती काशीमीरा पोलिसांना बुधवारी दुपारी मिळाली. महिलेचे वय ३० ते ४० वर्षांचे असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या महिलेची अन्यत्र हत्या केल्यानंतर तिची ओळख लपविण्यासाठी तिचा मृतदेह घोडबंदर येथील जंगलात आणून जाळण्याचा प्रयत्न केला असल्याचा संशय पोलिसांना आहे. मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्य़ातील पोलीस ठाण्यांमध्ये गेल्या दोन दिवसांत नोंदविण्यात आलेल्या हरवलेल्या व्यक्तींच्या तक्रारींची माहिती पोलीस घेत आहेत.