रेल्वे स्थानकांवर जागृती मोहीम

पानतंबाखूच्या पिचकाऱ्यांनी रेल्वे स्थानक परिसर विद्रूप करणाऱ्या प्रवाशांना वठणीवर आणण्यासाठी दंडाचा बडगा उगारूनही काही फरक पडल्याचे दिसून येत नाही. त्यामुळेच आता रेल्वे प्रशासनाने लोकप्रिय हिंदी चित्रपटांचे पोस्टर आणि त्यातील संवाद यांची मदत घेण्यास सुरुवात केली आहे. ‘शोले’तील गब्बर, ‘दीवार’मधील अमिताभ अशा व्यक्तिरेखांच्या चित्रमाध्यमातून थुंकणाऱ्या प्रवाशांना सावध आणि सजग करण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे.

तंबाखू आणि पान खाऊन कुठेही थुंकणाऱ्या प्रवाशांमुळे रेल्वे स्थानक परिसर बकाल होतो. त्यासाठी स्थानक परिसरात ठिकठिकाणी थुंकण्यास मनाई असल्याचे फलक लावले जातात. मात्र थुंकणारी मंडळी त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे या थुंकीबहाद्दरांना रोखण्यासाठी आता रेल्वे प्रशासनाने थेट बॉलीवूडमधील लोकप्रिय सिनेमांचा आधार घेतला आहे. चित्रपटांचे नायक आणि खलनायकांच्या लोकप्रियतेचा वापर करून थुंकीबाबत प्रबोधनाची नामी शक्कल रेल्वे प्रशासनाने लढवली आहे.  प्रवाशांच्या जनजागृतीसाठी अशा पद्धतीने फलक लावले आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी ए.के.सिंह यांनी दिली.

कल्याण रेल्वे स्थानकातील मधल्या पादचारी पुलावर ‘शोले’ आणि ‘दीवार’ चित्रपटातील काही गाजलेल्या संवादातून दंडाची माहिती दिली आहे. उदा. ‘दीवार’ चित्रपटातील मेरे पास रेलगाडी है, रिजर्व सीट है.., तुम्हारे पास क्या है.. मेरे मुंह में पान है.. ‘दीवार’पर मत थूकना..तर ‘शोले’ चित्रपटातील अबे ओ सांभा.. सरकारने हमारे उपर कितना इनाम रखा हे.. ऐवजी ‘अबे ओ सांभा थूंकने पर कितना जुर्माना रखा है.. पुरे ५०० रुपये’. असे वेगवेगळे संवादाचे फलक रेल्वेने लावले आहेत. कल्याण स्थानकानंतर इतर स्थानकांमध्येही अशा प्रकारची सिनेमाची पोस्टर्स पाहायला मिळणार आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी ए. के. सिंह यांनी दिली.