लेविस हाईन या अमेरिकन छायाचित्रकाराने ‘किड्स अ‍ॅट वर्क’ या पुस्तकाच्या माध्यमातून बालकामगारांच्या याचनामय छायाचित्रांचे दर्शन घडवले आहे. या पुस्तकामुळे जगभरामध्ये बालकामगार या विकृत संकल्पनेविरुद्ध जागृती निर्माण झाली आणि बालकामगारविरोधी कायदा अस्तित्वात आला. या पुस्तकाचे अंतरंग उलगडण्याचा प्रयत्न इंद्रधनु व मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या ‘शब्दयात्रा’ या उपक्रमाच्या माध्यमातून ज्योत्स्ना सोनाळकर यांनी केले. त्यांनी या पुस्तकातील संपूर्ण संग्रामपट अत्यंत जिवंत पद्धतीने उलगडला.
इंद्रधनु व मराठी ग्रंथसंग्रहालय या दोन संस्थांच्या माध्यमातून पुस्तकांच्या अभिवाचनाचा ‘शब्दयात्रा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. गेल्या रविवारी ज्योत्स्ना सोनाळकर यांनी लेविस हाईन यांचे ‘किड्स अ‍ॅट वर्क’, प्रा. वर्षां मुळे यांनी ‘धाकटय़ा राणीसाहेब’ हे स्वलिखित पुस्तक आणि श्रीकृष्ण सवदी यांचे ‘वेगळे प्रवास अनोखे प्रवास’ हे पुस्तक मृदुला निमकर यांनी श्रोत्यांसमोर मांडले. पुतळाबाई हे शिवचरित्रातील तसे दुर्लक्षित पात्र आहे. शिवाजी महाराजांची एक पत्नी यापलीकडे या व्यक्तिरेखेची फारशी ओळख वाचकांना नाहीच. पण महाराजांच्या वैयक्तिक आयुष्यात, तसेच त्यांच्या कौटुंबिक जीवनात पुतळाबाईंचे मोठे योगदान होते. हीच बाब प्रा. वर्षां मुळे यांनी त्यांच्या ‘धाकटय़ा राणीसाहेब’ या पुस्तकात मांडली आहे. त्याचे अभिवाचन करून हे पुस्तक वाचकांसमोर मांडले. मृदुला निमकर यांनी ‘वेगळे प्रवास अनोखे प्रवास’च्या माध्यमातून श्रीकृष्ण सवदी यांचे सनदी अधिकारी म्हणून काम करताना आलेले विविध अनुभव वाचकांसमोर मांडले. मृदुला निमकर यांनी अत्यंत रंजक पद्धतीने यातील विविध अनुभव श्रोत्यांसमोर मांडले.