‘व्यावसायिक कर्जासंबंधीच्या कायदेशीर बाबी’ या अनंत गद्रे यांच्या पुस्तकाचे नुकतेच टी.जे.एस.बी. बँकेचे सतीश उतेकर यांच्या हस्ते प्रकाशन झाले. या वेळी मुंबई उच्च न्यायालय व मुंबई ऋण वसुली न्यायालय येथे बँकांचे दावे चालवणारे वरिष्ठ वकील ऋषभ शहाही उपस्थित होते.
पुस्तक प्रकाशन सोहळ्यादरम्यान अनंत गद्रे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच पुस्तकाची माहिती उपस्थितांना दिली. बँकेत कर्ज विभागात काम करणारे कर्मचारी व बँकेचे दावे हाताळणारे वकील यांना उपयोगी पडावे, या हेतूने हे पुस्तक लिहिले असल्याचे गद्रे यांनी सांगितले. पुस्तकामध्ये कर्जाविषयीच्या कायदेशीर तरतुदींचा परामर्श घेण्यात आला आहे. या पुस्तकाचा उपयोग बँक कर्मचाऱ्यांना होईल, असा विश्वास सतीश उतेकर यांनी व्यक्त केला. बँकांशी निगडित कायदेशीर तरतुदींवर आधारित पुस्तकांची गरज असल्याचे मतही त्यांनी या वेळी व्यक्त केले. प्रमुख वक्ते ऋषभ शहा यांनी कर्जाचे दावे हाताळताना आलेल्या अनुभवांची जंत्री उपस्थितांसमोर मांडली. न्यायालयामध्ये कर्जासंबंधीची कागदपत्रे, करार, तारण दिलेल्या मिळकती, कर्ज खात्याचे उतारे याबाबतीत काळजी घेतली गेली नाही तर कर्जवसुलीत काय व कशा अडचणी येतात, याची विस्तृत माहिती या वेळी त्यांनी सांगितली. तसेच ते टाळण्यासाठी नागरिकांनी घ्यावयाची काळजी याविषयी विस्तृत विवेचन शहा यांनी केले.