29 February 2020

News Flash

प्रतिकूल परिस्थितीतील ग्रंथसेवा

१९९४ मध्ये श्रीनगर सार्वजनिक वाचनालय या नावाने ही संस्था ग्रंथसेवा करू लागली.

श्रीनगर सार्वजनिक वाचनालय

पत्ता -अय्यप्पा मंदिराजवळ, श्रीनगर, ठाणे (प). वेळ – सकाळी ९.३० ते १२.३०, सायंकाळी ५.३० ते ८.३०, बुधवार बंद.

वा चन संस्कृती टिकून राहावी, ग्रंथालयाच्या माध्यमातून साहित्याचे जतन व्हावे, यासाठी एखादा साहित्यप्रेमी आपल्या कष्टातून ग्रंथालय उभे करतो. पुढच्या काळात ते ग्रंथालय टिकून राहील, आपल्या पुढच्या पिढीला ग्रंथालयाचा उपयोग होईल इतक्या नि:स्वार्थी भावनेने ग्रंथालयांची निर्मिती होत राहते. मात्र अनेकदा ग्रंथालयासाठी लागणाऱ्या मूलभूत सुविधांची पूर्तता शासकीय पातळीवर पूर्ण न झाल्याने काही ग्रंथालयांना बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागते. असे असूनही सांस्कृतिक जडणघडणीत, वाचन संस्कृती वर्षांनुवर्षे टिकून राहावी यासाठी या समस्यांना तोंड देत काही ग्रंथालये आपल्यापरीने वाङ्मय सेवा करीत असतात. आपल्या संग्रहातून वाचकांना ग्रंथसेवा पुरवतात. ठाण्यातील श्रीनगर परिसरातील श्रीनगर सार्वजनिक वाचनालय हे अशाच प्रकारचे प्रतिकूलतेतही साहित्यसेवा देणारे ग्रंथालय म्हणता येईल.
मुख्य शहरापासून दूर असल्याने या परिसरात ग्रंथालयाची कमतरता भासत होती. श्रीनगर परिसरात शासकीय सेवेतून निवृत्त झालेले बरेच ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांना ग्रंथालयाची उणीव भासू लागली. त्यापैकीच एक असणाऱ्या गजानन वेलणकर यांनी या परिसरातील ग्रंथालयाची गरज लक्षात घेऊन १९९३ मध्ये आपल्या राहत्या जागेत ग्रंथालय सुरूकेले. पुढच्याच वर्षी रीतसर संस्था नोंदणीकृत करून ग्रंथालयाचा कारभार सुरू झाला. १९९४ मध्ये श्रीनगर सार्वजनिक वाचनालय या नावाने ही संस्था ग्रंथसेवा करू लागली. या ग्रंथालयाच्या बाबतीत विशेष म्हणजे गेल्या २१ वर्षांत जागेच्या समस्येमुळे ग्रंथालयास अनेकदा स्थलांतरित व्हावे लागले. ग्रंथालय भाडय़ाच्या जागेत आहे. अपुऱ्या निधीमुळे ग्रंथालयाकडे स्वत:ची जागा नाही. मात्र अशा परिस्थितीतही या ग्रंथालयाने आपली वाचनसेवा अखंडित सुरू ठेवली आहे. सुरुवातीला ग्रंथालयाच्या सभासदांनी वर्गणी काढून ४५० पुस्तके खरेदी केली. सध्या ग्रंथालयाच्या संग्रहात अकरा हजारपेक्षा जास्त पुस्तक संख्या असून परिसरातील नागरिकांसाठी अखंड साहित्यसेवा ग्रंथालय पुरवत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार २००१मध्ये या ग्रंथालयास ब वर्गाचा दर्जा प्राप्त झाला. ग्रंथालयात सध्या २०० सर्वसाधारण तर ६२ आजीव सभासद आहेत. दोन हजार पाचशे एवढी वर्गणी भरून आजीव सभासद ग्रंथालयातील पुस्तकांचा लाभ घेतात. मासिक वर्गणी ५० रुपये एवढी माफक असून, नवीन सभासद नोंदणीसाठी १० रुपये शुल्क घेतले जाते. बालवाचकांसाठी केवळ पाच रुपये वर्गणी घेतली जाते. एखाद्या सभासदाने २५० रुपयांपेक्षा जास्त किंमत असलेले पुस्तक वाचण्यासाठी नेल्यास अधिक अनामत रक्कम आकारली जाते. पुस्तकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ती अनामत महत्त्वाची ठरते. शासनाने देऊ केलेल्या अनुदानातून पुस्तकांची खरेदी केली जाते. काही पुस्तके ग्रंथालयाला देणगी स्वरूपात मिळतात. याशिवाय ग्रंथालयातर्फे वाचकांना ३५ ते ४० मासिके, साप्ताहिके, पाक्षिके वाचण्यासाठी उपलब्ध आहेत. तसेच ११२ दिवाळी अंक दिले जातात. ८० रुपये इतक्या माफक शुल्कात तीन महिन्यांसाठी वाचकांना या दिवाळी अंकांचा लाभ घेता येतो. पुस्तके आणि मासिकांशिवाय मराठी, हिंदी, इंग्रजी व गुजराती अशा भाषांमधील एकूण २० वर्तमानपत्रे ग्रंथालयात उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या प्रकाशन संस्थेकडून ही पुस्तके खरेदी केली जातात. पुस्तकांची किंमत कितीही महाग असली, तरी वाचकांची आवड लक्षात घेऊन ग्रंथालयाचे कर्मचारी पुस्तकांची खरेदी करतात. वेगवेगळ्या साहित्य प्रकारानुसार पुस्तकांची मांडणी केलेली पाहायला मिळते. प्रत्येक नवीन पुस्तकाचे बाईंडिंग, त्याला नवीन कव्हर लावणे ही कामे ग्रंथालयाचे कर्मचारी नित्यनेमाने करतात. सध्या ग्रंथालयात अनन्या सावंत या ग्रंथपालाची भूमिका सांभाळत आहेत, तर अर्चना मोहिते लिपिक म्हणून कार्यभार पाहत आहेत.
सध्याची ग्रंथालयाची जागा वाढत जाणाऱ्या पुस्तकांच्या तुलनेत अपुरी पडत आहे. जागा अपुरी असल्याने इच्छा असूनही ग्रंथालयात सांस्कृतिक उपक्रम राबविता येत नाहीत. मात्र जागेची तक्रार न करता ग्रंथालय आहे त्या जागेत वाचकांना सेवा पुरवत आहे. ग्रंथालयाला अ वर्गाचा दर्जा प्राप्त करून देण्यासाठी ग्रंथालयाचे कार्यकारी मंडळ प्रयत्नशील आहे. तसेच ग्रंथालयात संदर्भ ग्रंथ साठा ठेवण्यासाठी ग्रंथालय विशेष प्रयत्नात आहे. वाचकांमध्ये प्रौढ तसेच ज्येष्ठ नागरिक बहुसंख्येने आहेत. दररोज वर्तमानपत्रे वाचण्यासाठी सभासद येथे नित्यनेमाने येतात. वाचन समृद्ध व्हावे म्हणून ग्रंथालयात कथा-कादंबऱ्यांसोबत समीक्षणात्मक
पुस्तकेही उपलब्ध करून दिली आहेत,
अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष भास्कर पांडे यांनी दिली.
– किन्नरी जाधव

First Published on September 16, 2015 12:35 am

Web Title: book services
Next Stories
1 पांढरपोटय़ा नर्तक
2 सिमेंटच्या रस्त्यांवर कमाईची ‘धूळ’
3 शिवसेनेचा भाजपला धक्का
X
Just Now!
X