पुस्तकांपासून साकारण्यात आलेल्या इग्लू देखाव्याला वाचकांची पसंती
डोंबिवलीतील टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणेशोत्सवाचे औचित्य साधून ‘वाचाल तर वाचाल’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून वाचन संस्कृतीला चालना मिळावी यासाठी अनोखे पुस्तक प्रदर्शन भरविण्यात आले असून त्यास डोंबिवलीकर वाचकांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे. पै फ्रेण्ड्स लायब्ररीच्या मदतीने २० ते २५ सप्टेंबर या कालावधीत सकाळी ८ ते रात्री ९ या वेळेत सुयोग मंगल कार्यालय, टिळक रोड, डोंबिवली (पू.) येथे हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.
या वेळी गणेशोत्सवातील देखावा म्हणून सुमारे आठ हजार पुस्तकांपासून इग्लू साकारण्यात आले आहे. हा देखावा वाचकांचे लक्ष वेधत असून विद्येचे दैवत मानल्या जाणाऱ्या श्रीगणेशाच्या दर्शन सोहळ्यात भरविण्यात आलेले भव्य असे पुस्तक प्रदर्शन अनेक अंगांनी वैविध्यपूर्ण ठरले आहे. ठाणे, कल्याण डोंबिवली यांसारख्या शहरांमध्ये रस्ते अडवून गणेशोत्सव साजरा करण्याची जणू स्पर्धा सुरू असताना टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामार्फत मात्र दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत असतात.