|| नीलेश पानमंद

सुशोभीकरणासाठी करण्यात आलेल्या कामांमुळे मुळांना धक्का; महापालिकेच्या सर्वेक्षणात प्रकार उघड

ठाणे : शहराच्या मध्यवर्ती भागातील मासुंदा तलाव परिसरात वृक्ष पडून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वीच घडली होती. ही घटना ताजी असताना मासुंदा तलाव परिसरातील ६७ पैकी ३५ वृक्ष धोकादायक असल्याची माहिती हाती आली आहे. या तलावाच्या सुशोभीकरणासाठी पदपथ खोदताना वृक्षांच्या मुळांना इजा झाली असल्याने ते धोकादायक बनले आहेत, अशी माहिती वृक्ष प्राधिकरणाने केलेल्या सर्वेक्षणात आढळून आली आहे. यासंबंधीचा अहवाल प्राधिकरणाने सार्वजनिक बांधकाम विभागाला पाठविला आहे. तलाव परिसरात ३५ वृक्ष धोकादायक असल्याने येथील नागरिकांचा वावरही धोकादायक ठरण्याची चिन्हे आहेत.

मासुंदा तलाव परिसरात सकाळ व सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी अनेक जण येतात. या नागरिकांची संख्या मोठी असून ठाणे स्थानक, जांभळीनाका, मुख्य बाजारपेठ या भागांतील रस्ते तलावालगतच्या रस्त्यांना जोडण्यात आले असून यांमुळे या रस्त्यावरून वाहनांची मोठी वर्दळ सुरू असते. सद्य:स्थितीत टाळेबंदी लागू असल्यामुळे या ठिकाणी नागरिकांची वर्दळ कमी झाली आहे. या भागातील गुलमोहराचे एक झाड रिक्षावर पडल्याची घटना काही दिवसांपूर्वीच घडली. यामध्ये रिक्षाचालक आणि एका प्रवाशाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर महापालिकेच्या कारभारावर टीका होऊ लागल्यानंतर महापालिका वृक्ष प्राधिकरण विभागाने घटनास्थळाची पाहणी तसेच या भागातील इतर वृक्षांचेही सर्वेक्षण केले.

मुळासकट उन्मळून पडलेल्या वृक्षालगत दोन फुटांवर खोदकाम करून विद्युत खांब उभारण्यात आला असून त्याचबरोबर या वृक्षाच्या बुंध्यालगत जागेतूनच चार मोठ्या विद्युत तारा टाकण्यात आल्या आहेत. तसेच याबाबत विद्युत विभागाकडून  माहिती देण्यात आलेली नसल्याची बाब सर्वेक्षणादरम्यान वृक्ष प्राधिकरण पथकाच्या निदर्शनास आली आहे. विद्युततारा किंवा खांब उभारणीसाठी वृक्षांच्या बुंध्यालगत खोदकाम करण्यात येऊ नये आणि वृक्ष धोकादायक होणार नाही, याची काळजी घेण्यासंबंधी वृक्ष प्राधिकरण विभागाने विद्युत विभागाला कळविले आहे. तसेच या तलावाच्या सुशोभीकरणासाठी पदपथ खोदण्यात आले असून या खोदकामादरम्यान वृक्षांची मुळे तुटून उघडी पडल्याने ती धोकादायक झाली असल्याचेही सर्वेक्षणात समोर आले आहे. ही धोकादायक झाडे पडू नयेत यासाठी संरक्षक कट्टे बांधून त्यात मातीचा भर देण्यासंबंधी वृक्ष प्राधिकरण विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाला कळविले आहे.

ठाण्यातील मासुंदा तलाव परिसरात वृक्ष पडून झालेल्या दुर्घटनेनंतर येथील वृक्षांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. दुर्घटनाग्रस्त वृक्षालगत खोदकाम करून विद्युत खांब उभारणे आणि विद्युत तारा टाकण्याचे काम केले असून यामुळे मुळाला इजा होऊन ही घटना घडली. सर्वच ठिकाणी असेच खांब उभारण्यात आले असून ते काढून घ्यावे लागणार आहेत. याबाबत संबंधित विभागाला कळविले आहे. तसेच वृक्ष धोकादायक नेमके किती आहेत, याची आकडेवारी आता उपलब्ध नाही. तसेच या भागातील वृक्षांच्या फांद्या छाटणीची कामे करण्यात येत आहेत. – अलका खैरे, सहायक आयुक्त, ठाणे महापालिका

आंब्याचीही  झाडे

मासुंदा तलाव परिसरात एकूण ६७ वृक्ष आहेत. त्यापैकी ३५ वृक्षांची मुळे तुटून उघडी पडल्याने ती धोकादायक झाली आहेत. त्यामध्ये २९ पेल्टोफोरम, ०१ उंबर, ०२ आंबा, ०२ पाम, ०१ सातविन अशा वृक्षांचा समावेश आहे.