मध्य रेल्वे मार्गालगत असलेल्या झोपडय़ांमधून लोकल गाडय़ांवर दगड भिरकवण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी रेल्वे पोलिसांकडून वेगवेगळे उपाय आखले जात असतानाच मुंब्रालगत असलेल्या एका वस्तीतून लोकलवर दारूची बाटली आणि दगड भिरकवल्याची घटना सोमवारी घडली आहे. यामुळे दोन प्रवासी जखमी झाले आहेत.
छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कसारा दरम्यान, सोमवारी रात्री धावणाऱ्या एका लोकलवर दारूच्या रिकाम्या बाटल्या भिरकावण्यात आल्या. यापैकी काही बाटल्या लागून अमर ओरी (२३, रा. टिटवाळा) व राहुल चौधरी (२९, रा. डोंबिवली) हे दोघे तरुण जखमी झाले आहेत.
छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कसारा दरम्यान धावणाऱ्या लोकलने हे दोघे मुंबईहून कल्याणच्या दिशेने प्रवास करीत होते. मुंब्य्राचा पारसिक बोगदा पार केल्यानंतर लोकलच्या दिशेने अचानक हल्लेखोरांनी दारूच्या बाटल्या भिरकावल्या. पाठोपाठ दगडांचा मारा सुरू झाला. या हल्ल्यात दोघांच्या डोक्यास दुखापत झाली.
लोकल डोंबिवली स्थानकात येताच या जखमींना उपचारासाठी महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमी अमर ओरी याला उपचार करून नंतर सोडून देण्यात आले, तर राहुल चौधरी यास डोक्यास टाके पडले असून त्याच्या नातेवाईकांनी त्याला खासगी रुग्णालयात हलविले.
याप्रकरणी डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी जखमी तरुणांचे जबाब नोंदविले असून अधिक तपास करीत आहेत.
रेल्वे प्रवासादरम्यान चोरीच्या घटनांमुळे दोन महिलांना आपला जीव गमवावा लागला असतानाच रेल्वेवर बाटली व दगडफेक झाल्याने दोन प्रवासी जखमी झाल्याची घटना सोमवारी घडली. लागोपाठ घडणाऱ्या या घटनांमुळे रेल्वे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.