News Flash

शुल्क कमी करण्याची मागणी केल्याने मुलास शाळेतून काढले

गेल्या दीड वर्षाच्या काळात करोना महासाथीमुळे अनेक पालकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत.

डोंबिवलीतील प्रकार

डोंबिवली : गेल्या दीड वर्षाच्या काळात करोना महासाथीमुळे अनेक पालकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. व्यवसाय बुडाले आहेत. घर खर्च करणे अनेकांना शक्य नाही. अशा परिस्थित शाळेच्या शुल्कात वाढ करू नका, अशी मागणी डोंबिवलीतील शंकर विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या पालकांकडून केली जात होती. पण, त्यामुळे एका मुलास शाळेतून काढून टाकले आहे.

यासर्व पालकांचे नेतृत्व सोनारपाडा येथे राहणारे लालचंद पाटील हे करत होते. पाटील यांच्या पुढाकारामुळे इतर पालकही वाढीव शुल्क भरत नसल्याचा गैरसमज करुन या शाळा व्यवस्थापनाने लालचंद यांचा मुलगा सार्थक याचा शाळा सोडल्याचा दाखला टपालाने त्यांच्या घरी पाठवून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.  कोणतेही कारण न देता मुलाला तडकाफडकी काढुन टाकल्याने पाटील कुटुंबियांना धक्का बसला आहे. या विद्यालयातील पालकांनी   या प्रकाराबद्दल शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे.

पाटील यांच्या मुलाने शुल्क भरण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला शिक्षिकेने तुझा दाखला घरी पाठविण्यात आला आहे, असे उत्तर दिले. याबाबत शाळा व्यवस्थापनीशी सतत संपर्क साधला त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. शाळेने केलेली शुल्क वाढ आणि मुलाच्या दाखल्या संदर्भात घडलेल्या प्रकाराची चौकशी केली जाईल, असे कल्याण पंचायत समितीच्या गट शिक्षण अधिकारी सुनीता मोटगरे यांनी सांगितले.

शिक्षणमंत्र्यांकडे तक्रार

शुल्क भरू न शकल्याने शाळेतून काढून टाकले असल्याचा लाल शेरा या मुलाच्या दाखल्यावर लिहिण्यात आला आहे. यासंदर्भात पाटील यांनी शिक्षण मंत्र्यांकडे तक्रार करुन शाळेची मान्यता रद्द करण्याची मागणी केली आहे.  नवी मुंबईतील ५ शाळांतही असे वाद झाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2021 12:56 am

Web Title: boy expelled school demanding reduction fees akp 94
Next Stories
1 लस घेण्यापूर्वीच लसीकरण झाल्याची नोंद
2 निर्बंध आणखी शिथिल करू नका!
3 लशींच्या ‘टोकन’मध्येही राजकीय वाटमारी
Just Now!
X